
भारताची लोकसंख्या १४१ कोटींच्या वर आहे. या लोकसंख्येपैकी ३०% भाग हा मुलांनी व्यापलेला आहे. ५ ते १५ वयोगटातील मुलांची संख्या ४२ कोटींहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या ह्या लहान मुलांना बऱ्याचदा लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागतं. अजाणत्या वयात आपल्यासोबत काय होत आहे हे सुद्धा ह्या मुलांना माहीत नसतं. त्याची वाच्यता सुद्धा केली जात नाही. लैंगिक शोषण हे केवळ ग्रामीण आणि गरीब मुलांसोबत होतं, असं नाही. शहरी भागात, ज्या मुलांचे कुटुंबीय सधन आहेत, त्यांना मजुरीची कामे करावी लागत नसली, तरी देखील लैंगिक शोषणाच्या प्रसंगांना त्यांना देखील सामोरं जावं लागतं. त्यामुळे ह्या मुलांना त्यांच्या सुरक्षिततेविषयी जाणीव करून देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी मुंबईत अर्पण ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. आज ह्या संस्थेचा परिचय करून घेऊया.

अर्पण या संस्थेतर्फे मुलांना Personal Safety Education (PSE) अर्थात वैयक्तिक सुरक्षा शिक्षण दिलं जातं. तसंच विविध राज्यातील शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसोबत भागीदारी तत्त्वावर काम करून त्यांना वैयक्तिक सुरक्षेविषयी प्रशिक्षित केलं जातं, जेणेकरून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित राहण्यासाठी सक्षम करू शकतील. त्यासाठी अर्पणकडे तब्बल १२० निष्णात सामाजिक कार्यकर्त्यांची फौज आहे. हे कार्यकर्ते सरकारी, निमसरकारी तसेच खाजगी किंवा ट्रस्टमार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व शाळांशी संपर्क साधून, तिथल्या व्यवस्थापनासमोर आपल्या कामाची माहिती सादर करतात. शाळेकडून कामाला परवानगी मिळाल्यानंतर, मुलांचे लैंगिक शोषण होऊ नये ह्यासाठी काय दक्षता घ्यायची, ह्याबाबत हे कार्यकर्ते शिक्षक, समुपदेशक/कौन्सेलर आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतात.
मुलांना प्रत्यक्ष वैयक्तिक सुरक्षा शिक्षण देण्यापूर्वी त्यांच्या पालकांशी चर्चा केली जाते. त्यांना सुद्धा अर्पणच्या संपूर्ण कार्याची आणि मुलांसोबत होणाऱ्या समुपदेशनाची थोडक्यात कल्पना दिली जाते. शाळेतील कर्मचाऱ्यांसोबतच मुलांच्या पालकांनादेखील प्रशिक्षण दिलं जातं. मुलांच्या वागण्या-बोलण्यात झालेल्या बदलांवरून त्यांच्यासोबत एखादी असुरक्षित घटना घडल्याचं ते कसं ओळखू शकतात, मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून नेमकं काय घडलं आहे ते कसं जाणून घेऊ शकतात आणि एखादा गैरप्रकार घडल्याचे उघड झाल्यास त्यावर कारवाई कशी करू शकतात, याविषयी त्यांना मार्गदर्शन दिलं जातं. ह्यानंतर मुलांसोबत वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रम राबवून त्यांना लैंगिक शोषणाविषयी सविस्तर माहिती दिली जाते. ह्यामध्ये सुरक्षित व असुरक्षित स्पर्श कसा ओळखावा, असुरक्षित पद्धतीने स्पर्श करणाऱ्या व्यक्तीस नकार कसा द्यावा आणि अशा व्यक्तींविषयी आपल्या घरातील वडीलधाऱ्यांकडे किंवा शिक्षकांकडे तक्रार कशी करावी, हे शिकवलं जातं.

अर्पणचे कार्यकर्ते प्रत्येक मुलीशी, मुलाशी व्यक्तिश: चर्चा करतात. त्यांना पूर्वी कधी असा एखादा असुरक्षित अनुभव आला होता का, त्यावर त्यांनी काय केलं, किंवा भविष्यात जर त्यांच्यासोबत असा प्रसंग घडल्यास त्यांना काय करता येईल, ह्याविषयी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात. या गप्पांमधून त्यांना कोणता गैरप्रकार आढळलाच, तर ते शाळेला आणि मुलांच्या पालकांना याविषयी कल्पना देतात आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी मदत करतात. तसेच अशा प्रकारच्या घटनांमधून गेलेल्या पीडित मुलामुलींचे समुपदेशन केले जाते. शाळेमध्ये कार्यक्रम राबवून झाल्यानंतर शिक्षक आणि पालक ह्यांच्यासोबत सभा आयोजित करून त्यांचे अनुभव आणि सूचना ऐकल्या जातात. सूचनांवर अंमलबजावणी केली जाते.
मुलांमध्ये लैंगिकता आणि लैंगिक शोषणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची, समस्या सोडवण्याची तसेच कठीण परिस्थितीत सुयोग्य विचार करण्याची क्षमता, परस्पर नातेसंबंध, स्व-जागरूकता ह्यांसारखे विषय शिकवले जातात. एवढंच नाही तर, मुलांनी आपले मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबातील लहान सदस्यांसोबत अयोग्य लैंगिक वर्तन करू नये तसेच इतरांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करू नये, याविषयी त्यांना प्रशिक्षित केले जाते. बाल लैंगिक शोषणाचे दुष्परिणाम हे दूरगामी व विविधांगी असतात. नैराश्य, आत्मघातकी वर्तन, इतरांवरील अविश्वास, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती अशा अनेक दुष्परिणामांनी ती व्यक्ती घेरली जाऊ शकते. त्यामुळे ह्या दुष्परिणामांमधून सावरण्यासाठी अर्पणतर्फे पीडित मुलांना समुपदेशन व मानसोपचार सुविधा पुरवल्या जातात. सद्य:स्थितीत ज्यांचे शोषण सुरू आहे, अशा मुलांसोबतच, भूतकाळात ज्यांचे लैंगिक शोषण झाले आहे, अशी मुले व प्रौढदेखील ह्या मानसोपचारांचा लाभ घेऊ शकतात.

अर्पणने ४ ते ६ वर्षांच्या, ७ ते १० वर्षांच्या आणि ११ ते १३ वर्षांच्या मुलांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये ऑनलाईन कोर्सेसही तयार केले आहेत. ह्या ऑनलाईन कोर्सेसचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://www.arpan.org.in/children-and-adolescents/ ह्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
पूजा तापडिया ह्या अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून अर्पण ही बाल लैंगिक शोषणाच्या (सीएसए) उच्चाटनासाठी काम करणारी भारतातील एक आंतराराष्ट्रीय ख्यातीची व पुरस्कारप्राप्त संस्था आहे. मुंबई येथे स्थित असलेली अर्पण ही भारतातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असून ती लहान मुले व प्रौढ अशा दोघांसाठी बाल लैगिंक शोषणाशी निगडित प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा पुरवत आहे. शासकीय, निमशासकीय आणि अशासकीय संस्थांसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारतातील बाल लैंगिक शोषणाच्या समस्येवरील प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना करण्यात, अर्पण हे एक अग्रेसर असलेले नाव आहे. तसेच ही संस्था समर्थन व संशोधनाच्या मदतीने स्थानिक, राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक व रचनात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. २००७ पासून अर्पणने २० लाखांपेक्षा अधिक मुले व प्रौढांसोबत काम केले असून ६ राष्ट्रीय आणि २ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले आहे. या पुरस्कारांमध्ये ‘WISE’ आणि ‘द सी हेनरी केम्पे अॅवॉर्ड’ या पुरस्कारांचा देखील समावेश आहे.