
जगात सर्वश्रेष्ठ दान कोणतं असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर नेत्र दानापासून ज्ञानदानापर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख तुम्ही कराल. पण एक दान असं आहे जे माणसाला आयुष्यभर पुरतं. ते दान आहे उमेदीचं. तुम्ही एखाद्या दु:खी माणसाशी आधाराचे, उमेदीचे दोन शब्द बोललात तर त्या माणसाला कोणत्याही परिस्थितीत लढण्याची ताकद मिळते. बरोबर ना? “लिटील मोअर” ही संस्था आजाराने त्रस्त झालेल्या मुलांना आणि मोठ्यांना अशीच उमेद देऊन आजाराचा सामना करण्यासाठी तयार करते. अशी उमेद देणाऱ्या “लिटील मोअर” या नावातच त्यांच्या कार्याचं इंगित आहे. उमेद वाढवण्यासाठी ही संस्था फक्त शब्दांचा आधार देत नाही तर रुग्णांच्या आजारांशी सामना करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली सर्व मदतही करते. चला, ह्या संस्थेविषयी जाणून घेऊया.
ह्या संस्थेच्या संस्थापिका स्मृतिशेष लीना पवार ह्या जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थिनी. साधारण १९८८-८९ मध्ये जेजेतील त्यांच्या मित्र मैत्रिणींकडे जी नियतकालिकं यायची, त्यांची रद्दी विकून किमान २५०० रुपये साठायचे. ही रक्कम घेऊन त्या अहुजा हॉल इथे येणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांना मदत करायच्या. हीच ती थोडं जास्त देण्याची म्हणजेच ‘लिटील मोअर’ ही संकल्पना त्यांच्या मनात तेव्हापासून रुंजी घालत होती. ह्या रुग्णांमधल्या उत्तर प्रदेशातून आलेल्या दोन मुलींशी त्यांचं विशेष नातं जडलं. त्यांनी या मुलींना त्यांच्या आवडत्या वस्तू घेऊन दिल्या. यामुळे या दोघींमध्ये जगण्याची उमेद निर्माण झाली. मात्र त्यांचा आजार बळावला आणि त्यांचं निधन झालं. लीनाताईंना याचा धक्का बसला. पण अशा रुग्णांना मदत करण्याच्या निश्चयाने त्यांच्या मनात ठाण मांडलं. पुढे २००९ साली जेव्हा त्यांना रक्ताचा कर्करोग असल्याचं निदान झालं तेव्हा त्या खचल्या नाहीत, उलट उपचारासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे जाणं वाढलं तेव्हा तिथे येणारे कर्करोगाचे अनेक रुग्ण बघून त्या अस्वस्थ होत असत. आजही हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलाबाळांवर आणि नातेवाईकांवर उपचार करण्यासाठी अनेक लोक महाराष्ट्र आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत येत असतात. त्यांच्या राहण्या-खाण्यापिण्याची आबाळ होत असते. त्यामुळे उपचारा दरम्यान ते स्वत:ची आणि रुग्णाची नीट काळजी घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदतीच्या हाताची आणि उमेदीची गरज असते. “देणाऱ्याने देत जावे” ही लीनाताईंची वृत्ती पहिल्यापासून होतीच. त्यांनी आपल्या परिचितांना ह्या सगळ्याची कल्पना दिली. लीनाताईंच्या या पुढाकाराला त्यांनी देणगी देऊन हातभार लावला आणि १६ ऑक्टोबर २००९ रोजी किमान ५०० रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक असणाऱ्या नॅपकीन, मेडीमिक्स साबण, डेटॉल, ब्रश, पेस्ट, खाण्यापिण्याच्या वस्तू, कॅम्लिनचं चित्रकलेचं सामान अशा एकूण १३ वस्तूंचा संग्रह असलेल्या गुडी बॅग्ज दिल्या. त्याच वेळी त्यांनी या कामाला पुढे नेण्यासाठी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांची मुलगी गीताली पवार आणि त्यांचे एक स्नेही चेतन सावला यांच्या सोबतीने त्यांनी “लिटील मोअर”ची स्थापना केली. लीनाताईंचे पती ख्यातनाम कवी आणि कमर्शिअल आर्टीस्ट षांताराम पवार यांनी पहिली देणगी दिली आणि हा प्रवास सुरु झाला. तेव्हापासून आजतागायत या संस्थेच्या मार्फत टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांचं समुपदेशन, स्वयंसेवक प्रशिक्षण आणि विविध उपक्रम चालवले जातात.

“लिटील मोअर”ची स्थापना झाल्यावर काही दिवसात म्हणजे २३ जानेवारी २०१० रोजी लीनाताईंचं निधन झालं त्यानंतर गेली १३ वर्षे संस्थेचा डोलारा गीताली पवार, त्यांची बहिण गार्गी फरीद, चेतन सावला आणि ४० स्वयंसेवकांनी नेटाने सांभाळला. लीनाताईंनी रोवलेल्या एका बीजाचं रुपांतर आज त्यांनी वटवृक्षात केलं आहे.
लीनाताईंनी सुरु केलेल्या गुडी बॅग्जचं वाटप टाटा हॉस्पिटलमधल्या किमान ४०० रुग्णांमध्ये थंडीच्या आधी, पावसाळ्याच्या आधी आणि २३ जानेवारी या लीनाताईंच्या स्मृतीदिनी करतात. ह्या गुडी बॅग्जमध्ये त्या त्या मोसमात आवश्यक असणाऱ्या वस्तूंपासून ते रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू असतात. नुकत्याच झालेल्या लीनाताईंच्या स्मृतीदिनी ज्या गुडी बॅग्ज वाटल्या त्यात नॅपकीन, टूथब्रश, टूथ पेस्ट, मेडीमिक्स साबण, बिस्कीटचे पुडे, मास्क, स्टीलचे ताट, वाटी, टिफिन, स्त्रियांना पेटीकोट, पुरुषांना लुंगी, मुलांना टी शर्ट, जिगसॉ पझल ह्या वस्तू वाटल्या. रुग्णांना दर महिन्याच्या १५ तारखेला ‘अनाज दान’ केलं जातं ज्यात ३ किलो तांदूळ, १ किलो तूर डाळ, १ किलो मुग डाळ, ३ किलो गव्हाचं पीठ, १ किलो ज्वारीचं पीठ, १ किलो तेल, १/१ किलो साखर आणि मीठ, पाव/पाव किलो मुग, मटकी आणि चणे ह्या वस्तू दिल्या जातात.
मुलांना सगळ्यात मोठं अप्रूप असतं ते त्यांच्या वाढदिवसाचं. पण कर्करोग झालेल्या मुलांचा वाढदिवस सुद्धा इतर दिवसांप्रमाणे निरस आणि औषधं, गोळ्या, ट्रिटमेंट नी टेस्ट याच गोष्टीनी भरलेला असतो. अशा मुलांचा वाढदिवस “लिटील मोअर” तर्फे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यांना भेटवस्तू दिल्या जातात. मुलं यावेळी खूप धम्माल करतात.
“एड्यूटेनमेंट” ह्या संकल्पनेमध्ये आजारामुळे अभ्यासाला मुकलेल्या सातवी ते नववीच्या मुलांना सीबीएसई आणि एनसीईआरटीच्या धर्तीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन शिकवून त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला जातो.
टाटा हॉस्पिटलमध्ये ओरल किमोथेरपी घेणाऱ्या रुग्णांच्या औषधोपचारांची सातत्याने देखरेख करणं आवश्यक असतं. ते औषधं वेळेवर घेत आहेत की नाहीत, त्यांना त्याचा काही त्रास तर होत नाही ना याचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी “लिटील मोअर”चे स्वयंसेवक डॉक्टरांना मदत करतात.
“लिटील मोअर”चे स्वयंसेवक कर्करोगाचे निदान झाल्यावर खचून गेलेल्या रुग्णांचं. त्यांच्या नातेवाईकांचं समुपदेशन करतात. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करतात. त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांना उपचारांसाठी मानसिक आधार देऊन सक्षम करतात. उपचारा दरम्यान काही समस्या उद्भवल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करतात.
आजाराने पिचलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हातात उपजीविकेचं साधनही शिल्लक रहात नाही. अशा लोकांना कॉर्पोरेट कंपन्यांना आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात जेणेकरून ते पुन्हा स्वयंपूर्ण होऊ शकतात.
“लिटील मोअर” कर्करोगासोबतच क्षयरोग, कुष्ठरोग आणि मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आजाराशी सामना करता यावा म्हणून अनेक उपक्रम राबवत आहे. या रुग्णांमधील उपजत कला त्यांच्या आजारांमुळे दबलेल्या असतात. त्यांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आर्ट थेरपीचा वापर करून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “क्षयरोग मुक्त भारता”ची घोषणा केल्यावर अनेक संस्थांनी यासाठी कंबर कसली. महाराष्ट्रातील अशा १०० संस्थाचा १७ सप्टेंबर २०२२ रोजी माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथे सत्कार करण्यात आला. त्यात “लिटील मोअर”चा सुद्धा सत्कार करण्यात आला.

कर्करोग, कुष्ठरोग, मधुमेह आणि क्षयरोग अशा कोणत्याही आजाराचं निदान जितक्या लवकर होईल तितक्या लवकर उपचार सुरु करून आजार बरा होण्याच्या शक्यता वाढतात. म्हणून संस्थेतर्फे निवासी सोसायट्या, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कार्यालये, स्पोर्ट क्लब अशा विविध ठिकाणी आणि गावोगावी आरोग्य सत्रे आयोजित केली जातात. योग्य जीवनशैलीने मधुमेहासारख्या आजारावर मात करता येते हे “लिटील मोअर”ची प्रस्तुती असलेल्या ‘एक चिडिया’ ह्या लघुपटातून दाखवलं जातं. हा लघुपट https://www.youtube.com/watch?v=8xQKJFGshNs&t=3s इथे क्लिक करून पाहता येईल.
दरवर्षी ८ ऑक्टोबर हा लीनाताईंचा वाढदिवस “लिटील मोअर”चा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्नेहसंमेलन आयोजित केलं जातं. दरवर्षी कला शाखेतील काही यशस्वी विद्यार्थ्यांचा अष्टपैलू षांताराम पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जातो.