अभिनेते टिकू तलसानिया येणार ‘‘झोलमॉल” करायला!

मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ पुन्हा सुरु झाल्यानंतर हिंदीतील अनेक लहान मोठे कलाकार मराठी सिनेमात झळकू लागले आहेत. अगदी अक्षय कुमार, सलमान खान या दिग्गजांनी सुद्धा मराठी पडद्यावर हजेरी लावली आहे. यात आता हिंदीतील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांची सुद्धा वर्णी लागली आहे.  

यापूर्वी टिकू तलसानिया हे अभिनेते-दिग्दर्शक अतुल काळे यांच्या ‘बाळकडू’ या मराठी चित्रपटात दिसले होते. त्यांनतर आठ वर्षांनी आता ते पुन्हा मराठीत येत आहेत.

मराठी चित्र, नाट्य आणि टेलीविजन क्षेत्रात गेली पस्तीस वर्षं कार्यरत असणाऱ्या राज कुबेर यांनी त्यांच्या आगामी ”झोलमॉल” ह्या चित्रपटात अभिनय करण्यासाठी टिकू तलसानिया यांना विचारलं. ह्या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर तलसानिया यांनी या चित्रपटात काम करण्यासठी होकार दिला.   

आता पन्नाशीत किंवा अधिक वयाच्या लोकांना “ये क्या हो रहा है?” हा विनोदी संवाद चांगलाच आठवत असेल. ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेतील हा संवाद लोकप्रिय करणारे अभिनेते म्हणजे टिकू तलसानिया. त्यांचा जन्म ७ जून १९५४ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. घरात सर्व लोक वैद्यकीय पेशात असताना सुद्धा टिकूचा कल मात्र अभिनयाकडे  होता.  वडिलांचा विरोध असला तरी आईच्या पाठींब्यामुळे वयाच्या अवघ्या चवथ्या वर्षी त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं. हा सिलसिला पुढे कायम राहिला. वयाच्या तिशीत असताना म्हणजे १९८४ साली त्यांना “किशमिश” या गुजराती नाटकात ख्यातनाम दिग्दर्शक कुंदन शहा यांनी पाहिलं आणि ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेत काम करण्याविषयी विचारलं. टिकू यांनी होकार दिला. ही मालिका आणि टिकू यांची वाहवा झाल्यावर पुढे त्यांनी अनेक मालिकांमधून काम केलं. त्यावेळी टीवीचा पडदा त्यांच्या विनोदी अभिनयाने बहरू लागला. पुढे ‘अंदाज अपना अपना’, ‘कुली नं-१’, ‘तराजू’, ‘हिरो नं-१’, ‘देवदास’, कभी हां कभी ना’ अशा २०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.  या चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी, खलनायकी, भावनिक अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या.

आता टिकू तलसानिया ‘झोलमॉल’ या आगामी मराठी चित्रपटात आगळीवेगळी भूमिका साकारणार आहेत. ‘झोलमॉल’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुबेर करत आहेत्.

या चित्रपटात  अभिनेते भरत जाधव, मंगेश देसाई, भारत गणेशपुरे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, हेमांगी कवी, स्मिता गोंदकर, अश्विनी कुलकर्णी असे मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. नागपूरच्या पद्मा फिल्म्स प्रॉडक्शनची ही पहिलीच निर्मिती असून हरीषकुमार बाली हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. टिकू तलसानिया यांना मराठीतही उदंड यश लाभो ही सदिच्छा!

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *