आर्थिक स्वावलंबन : काळाची गरज

सर्वच क्षेत्रात महागाई वाढलेली असून या सामाजिक परिस्थितीत टिकून रहायचे असेल तर कुटुंबातील स्त्री व पुरुष दोघांनाही नोकरी-व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. गृहिणी कुटुंबातील आपल्या दैनंदिन कामाचे यथायोग्य नियोजन करून उर्वरीत वेळात आर्थिक कमाई करू शकतात. असे काही छोटे-छोटे व्यवसाय आहेत, जे आपल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी चांगल्या प्रकारे हातभार लावू शकतात.
शिकवण्या घेणे
शिक्षित गृहिणी शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुला-मुलींच्या शिकवण्या घेऊ शकतात. अलीकडे आई-वडील दोघेही नोकरी करीत असल्याने मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. असे पालक उत्तम शिकवणीच्या शोधातच असतात. एकदा पाऊल उचलले की त्यातील कसब शिकत जावे. स्वतःला सिद्ध करावे. हळूहळू आपल्याकडील मुले वाढत जातील.आत्मविश्वास येईल.त्यानंतर आपण स्वतःचे शिकवणी केंद्रही सुरु करू शकता.
आपल्यातील कौशल्य शिकविणे : अशा काही महिला आहेत ज्यांना विवाहापूर्वी वेगवेगळे छंद होते. लग्नानंतर ते मागेच राहतात. तसे न करता महिलांनी आपणास येत असलेल्या गोष्टी इतरांना शिकवाव्यात. उदाहरणार्थ : संगीत शिकविणे, शिलाई काम शिकविणे, पाककला शिकविणे, खेळांचे वर्ग घेणे, इ. यामुळे आर्थिक कमाई होईलच, शिवाय आपल्यातील कला जिवंत ठेवल्याचा आत्मानंद मिळेल.
यु टूब चॅनेल सुरु करणे : आपणास ज्ञात असलेल्या गोष्टी प्रत्येकापर्यंत पोहोचवून त्याद्वारे आर्थिक कमाई करण्यासाठी स्वतःचे यु टूब चॅनेल गृहिणी सुरु करू शकतात. नवनवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकतात.
पदार्थ निर्मिती व विक्री करणे : गृहिणींचा अर्थातच वेगवेगळे स्वादिष्ट पदार्थ बनविण्यात हातखंडा असतो. असे पदार्थ बनवून त्यांची विक्री करणे हासुद्धा एक चांगला व्यवसाय आहे. अलीकडे व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून महिला आपल्या या छोट्या छोट्या व्यवसायांची उत्तम प्रकारे जाहिरात करू लागल्या आहेत आणि हे योग्यच आहे. व्यवसायासाठी आपल्याला सोशल मीडियावरसुद्धा भरपुर लोकांशी संपर्क निर्माण करावा लागतो. वेगवेगळे गृप तसेच पेजेस बनवुन आपल्या व्यवसायाची जाहिरात करावी लागते.
गृहिणींनी आपला फावला वेळ गप्पागोष्टींमध्ये न दवडता तो सार्थकी लावला पाहिजे. नवनव्या गोष्टी शिकून त्याचा आर्थिक स्वावलंबनासाठी कसा उपयोग करून घेता येईल ते पाहिले पाहिजे. लक्षात घ्या, आर्थिक स्वावलंबन हीच काळाची गरज आहे.