झावळीपासून खतनिर्मिती

गांडूळ खताला बाजारात मोठी मागणी आहे. अलीकडे शेतकरीसुद्धा रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत वापरू लागले आहेत. त्यामुळे गांडूळखत निर्मिती हा एक शेतीपूरक आर्थिक कमाई करून देणारा उत्तम व्यवसाय आहे. नारळाच्या झाडाला ‘माड’ म्हणतात. या माडाच्या पानाला ‘झावळी’ म्हणतात. या झाडाला महिन्याला एक नवीन झावळी येते तर सर्वसाधारणपणे एक झावळी तयार मिळत असते. त्याचबरोबर जमिनीत रुजणारे इतर गवतही उपलब्ध होत असते. या सामग्रीपासून गांडूळांच्या सहाय्याने बनविलेले खत दर्जेदार असते. याला ‘झावळीचे खत’ असे म्हणतात.
या झावळ्या व बागेतील अन्य पालापाचोळा एकत्र करून घ्यावा. यामध्ये 1-1 या प्रमाणात शेण व कुजलेला पाचोळा यांचे थर द्यावेत. त्यावर पाणी शिंपडून ते ओले करावे. त्यामध्ये 10 किलो मिश्रणामागे ५० गांडुळ सोडावेत. या युनिटसाठी सावलीची व्यवस्था करावी. ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर आवश्यकतेनुसार वारंवार पाणी शिंपडावे. एक ते दोन महिन्यांत यांची वाढ होऊन जवळजवळ 300 पटींनी गांडूळ वाढतात. हे गांडूळ मोठ्या प्रमाणात खतनिर्मितीसाठी वापरावेत.

गांडूळ खत हे खड्डा पद्धत व ढीग पद्धत या दोन्ही पद्धतींनी करता येते. उपलब्ध घटकांनुसार सिमेंट टाकी बांधावी. टाकीत गांडूळ खत तयार होण्यास दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत वाफे ओले राहण्यासाठी त्यावर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे.
ज्याठिकाणी गांडूळ खत तयार केले जाणार आहे, तो भाग सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मंडप अगर छप्पर करावे. झावळ्यांचे तुकडे, पालापाचोळ्यावर गांडूळ सोडावेत. वापरण्यात आलेल्या झावळ्यांनुसार 70 टक्के गांडूळखत 60 ते 75 दिवसांत तयार होते. त्यावेळी पाणी शिंपडणे थांबवावे; जेणेकरून गांडूळ खालच्या थरात निघून जातील.

दोन आठवड्यांनंतर गांडूळविरहित वरच्या थरातील गांडूळ खत जमा करावे. ते चाळून घेऊन सावलीत वाळवावे. तसेच खालच्या थरात जमा झालेले गांडूळ पुढील गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरावेत.
नारळ झावळीपासून तयार झालेल्या गांडूळ खतात 1.2 ते 1.8 टक्के नत्र, 0.1 ते 0.2 टक्का स्फुरद व 0.2 ते 0.4 टक्के पालाश अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. याचे आकारमान इतर सेंद्रिय खतांपेक्षा कमी असल्याने, वाहतूक व वापरण्यासाठी सोपे जाते.
काथ्यानिर्मितीमध्ये नारळाच्या ‘सोडणा’पासून काथ्या अलग केल्यानंतर त्याचा भुसा उरतो. हा भुसा काथ्या व भुशाचे प्रमाण पाहिले तर 1:2 असतो. या भुशामध्ये त्याच्या वजनाच्या 10 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे; परंतु या भुशात अगदी अल्प प्रमाणात नत्राचे प्रमाण असते. ‘लिगनिन’ आणि ‘फायटोटॉक्सिक पॉलिफिनॉल’ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे याचा खत म्हणून वापर करावयाचा असेल तर त्यासाठी अगोदर त्याचे कंपोस्ट खत करावे.