ग्रामीण भागातील स्वयंरोजगार

वाढलेली लोकसंख्या, साक्षरतेचा उच्च दर यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे. मनपसंत नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे, अर्थातच स्वयंरोजगार केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. व्यवसाय-धंदा कोणताही असो तो जिद्दीने व चिकाटीने केला तर त्यात यश नक्की मिळते. आता महाजालचे (इंटरनेट) युग आहे. इंटरनेटमुळे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आपण आपल्या व्यवसायाला जगभर ओळख देऊ शकतो.
ग्रामीण भागात कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात, याविषयीची माहिती यात देत आहोत.
एखाद्या ग्रामीण भागातील तरुणाला उद्योजक होण्याची इच्छा असेल, तर तो गावात एखादा लहानमोठा व्यवसाय सुरु करू शकतो. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपणास नेमका कोणत्या स्वरूपाचा व्यवसाय करायचा आहे, हे ठरवावे. म्हणजेच, आपणास सेवा क्षेत्रात काम करायचे की नवीन उत्पादन करायचे आहे हे ठरवावे.
ग्रामीण भागात व्यवसाय करीत असताना जेथे व्यवसाय करायचा आहे तेथे कोणत्या व्यवसायाची गरज आहे, याचा अभ्यास करावा. ग्रामीण भागात ग्राहक कमी असतात. त्यामुळे याचा विचार आधी करावाच लागतो.
व्यवसायासाठी आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण घटक समजून घ्यावेत. श्रम करण्याची स्वतः ची मानसिक तसेच शारीरिक तयारी हवी. थोड्या प्रमाणात का होईना, भांडवलाचीही गरज असते. ग्राहकांशी जुळवून घेता आले पाहिजे. त्यांच्याशी आदराने बोलता आले पाहिजे. कामगारांना सांभाळून घेता आले पाहिजे.

ग्रामीण भागात आपण खालील उद्योग सुरु करू शकतो.
ऑनलाईन सर्व्हीस सेंटर
या सेंटरमध्ये आपण सर्व प्रकारची ऑनलाईन कामे करून देऊ शकता. रेल्वे बुकिंग करणे, परीक्षा तसेच अन्य फॉर्म भरणे, अशा प्रकारची सेवा देऊन स्वतःचा उत्तम रोजगार निर्माण करू शकता.
किराणा तसेच जनरल दुकान
गावात किराणा दुकान तसेच जनरल दुकान सुरु करू शकता. लोकांना कमी-अधिक प्रमाणात लागणाऱ्या अनेक गोष्टींची विक्री करू शकता.
हॉटेल/स्नॅक्स सेंटर
गावात हॉटेल/स्नॅक्स सेंटर सुरु करू शकता. आपणास चांगले पदार्थ बनविता येत असल्यास असे पदार्थ विक्रीस ठेवू शकता.

बेकरीचा व्यवसाय
बेकरी उत्पादने स्वतः बनवू शकता; किंवा तयार पदार्थांची विक्री करू शकता.
फळे,भाजीपाला विक्री व्यवसाय
गावात फळे, फुले, भाजीपाला विक्री करू शकता. फक्त या नाशवंत वस्तू असल्याने सुरुवातीला त्या कमी प्रमाणात ठेवाव्या लागतील. चांगला जम बसल्यावर त्याचे प्रमाण आपण वाढवू शकता.
साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय
मंडप, खुर्च्या, भांडी, कपडे असे बऱ्याच प्रकारचे साहित्य आपण भाड्याने देऊ शकता.
ब्युटी सलून
गावात एखादे सलून, ब्युटी पार्लर सुरु करू शकता.
शेतीस आवश्यक वस्तू/अवजारांचे दुकान
अशा प्रकारचे दुकान तर गावात हवेच. असे दुकान आपण सुरु करू शकता. त्याचबरोबर शेतीविषयक सल्लाही देऊ शकता.
फोटोग्राफी
फोटोग्राफी हा एक छान व्यवसाय आहे. गावातसुद्धा अनेक कार्यक्रम होत असतात. आपण स्वतः फोटो सेशनची कामे करू शकता.
आईस्क्रीम पार्लर
एखादे आईस्क्रीम पार्लरसुद्धा गावात उत्तम चालू शकते.
चला तर मग, असे व्यवसाय शोधूया आणि सुरु करूया.