घरगुती उद्योगाद्वारे मिळवा समृद्धी

महिलांना घरबसल्या करता येण्याजोगे छोटे छोटे गृहोद्योग आहेत. हे उद्योग करण्यासाठी त्यातील कौशल्ये आत्मसात करायला हवीत. आपल्याला घर सांभाळून ज्या प्रमाणात झेपेल अशा पातळीवर व्यवसायातील पहिले पाऊल उचलावे. घरच्या घरी करता येऊ शकतील असे काही उद्योग :
घरच्या घरी शिवणकाम
शिवणकाम ही एक कला आहे. पूर्वी महिला घरीच शिवणकाम करायच्या, त्यामुळे घरातील मुली व महिलांना शिवणकामाचे ज्ञान असायचे. आजकाल शिवणकाम फाटलेले कपडे शिवणे एवढेसुद्धा मर्यादित राहिले नाही. शिवणकामातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते. यात ‘बेसिक’ आणि ॲडव्हान्स असे अनेक कोर्सेस असतात. आपल्याला शिवणकामात रस असेल तर आपण शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकता. महिलांसाठी खास ब्लाऊज, ड्रेसेस, बाळाचे कपडे, पुरूषांचे कपडे अशा विविध प्रकारचे कपडे शिवू शकता. आपण स्वतःचा ‘टेलरिंग’ चा व्यवसाय सुरू करू शकता. एवढेच नाही तर इतरांना शिवणकामसुद्धा शिकवू शकता. घरच्या घरी असे प्रश्क्षण वर्ग सुरू करू शकता. शिवणकाम हा महिलांसाठी उत्तम असा घरी करण्यासारखा व्यवसाय आहे.
मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय
मेणबत्तीची गरज नियमित लागते. दिवाळी अथवा एखाद्या खास प्रसंगी शहरात मोठ्या प्रमाणावर रोषणाई केली जाते. घरात मनमोहक मेणबत्तीने सजावट केली जाते. वाढदिवसाच्या केकसाठी वयानुसार अथवा खास डिझाईनच्या मेणबत्त्या विकल्या जातात. मेणबत्तीला विशेष मागणी असल्यामुळे मेणबत्ती बनविण्याचा व्यवसायदेखील खूप फायदा मिळवून देणारा आहे. यासाठी आजकाल अनेक महिला लघुउद्योग प्रशिक्षण केंद्रात याचे मार्गदर्शन केले जाते. शिवाय यासाठी लागणारा कच्चा माल फार महागडा नसतो. मेण, विक्स, कृत्रिम रंग, प्रॉडक्शन मशीन अशा मर्यादित गोष्टींसह आणि कमी भांडवलात महिला घरच्या घरी मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय करू शकतात. कलात्मक व्यवसाय असल्यामुळे कौशल्यानुसार स्वतःच्या उत्पादनाची स्वतंत्र ओळख बाजारात करू शकता.

अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय
घरात धार्मिक विधींसाठी अगरबत्ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. साहजिकच भारतात सणसमारंभ व पूजाविधींसाठी अगरबत्तीची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. दररोज लागणारी गोष्ट असल्याने तुम्ही अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी महिलांनी अगरबत्ती बनविण्याच्या कार्यशाळेत सहभागी व्हावे. त्याचे रितसर प्रशिक्षण घ्यावे. अगरबत्तीसाठी लागणारा कच्चा माल सहज उपलब्ध होऊ शकतो. ज्यामुळे महिलांना घरच्या घरी करण्यासाठी हा व्यवसाय उत्तम आहे. कमी भांडवलासह चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी महिलांनी घरीच अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यास काहीच हरकत नाही. यासाठी योग्य कौशल्य, गुणवत्ता व ब्रॅंडिंगवर भर द्यावा. ज्यामुळे व्यवसाय चांगला चालेल. बाजारपेठेमध्ये तुमच्या उत्पादनाची मागणी वाढेल.
मेहंदी काढण्याचा व्यवसाय
मेंहदी काढणे ही एक कला आहे. घरात सणसमारंभ, कार्यक्रम, लग्नसोहळ्यात मेंहदी काढली जाते. त्यामुळे अनेक महिलांना मेंहदी काढण्याचा सराव असतो. जर तुमच्याकडे मेंहदी काढण्याचे कौशल्य असेल तर त्याचा वापर तुम्ही व्यवसायासाठी करू शकता. लग्नकार्यात अथवा कार्यक्रमांसाठी मेंहंदी काढणे, मेंहदीचे कोन करून विकणे, मेंहदी शिकविण्याचे वर्ग घेणे असे विविध व्यवसाय तुम्ही या कलेतून करू शकता. जर आपल्याकडे मेंहदी काढण्याचे ज्ञान नसेल तर आधी याचे रितसर प्रशिक्षण घ्यावे. मगच महिलांनी घरी हा व्यवसाय सुरू करावा; शिवाय मेंहदीचे ‘ट्रेंड’ नेहमी बदलत असतात. त्यामुळे ग्राहकांना काय आवडते त्यानुसार व्यवसायात बदल करावेत. ज्यामुळे या व्यवसायातून चांगला फायदा मिळू शकतो.
दागिने घडवा घरच्या घरी !
दागिने हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय असतो. सणसमारंभ वा एखादा खास कार्यक्रम असो, महिलांना दागिने घालण्याची हौस असते. जर आपल्याजवळ कलाकुसर करण्याचे ज्ञान असेल तर आपण दागिन्यांचा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता. आजकाल ‘ज्वेलरी मेंकिंग’ चे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. कमीत कमी भांडवलात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. दागिने बनविण्याचे रितसर प्रशिक्षण घेतल्यास या व्यवसायात चांगली गती मिळू शकते.