मराठी चित्रपट – बकेट लिस्ट

माधुरी दीक्षितचा ‘बकेटलिस्ट’ हा पहिला मराठी चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरला नसेल, तर नवल! अजून पाहिला नसेल तर नक्की पहा, बरं!

मधुरा साने ही घरात आणि घरातल्या माणसांमध्ये गुरफटलेली एक गृहिणी आहे.  स्वत:च्या इच्छा आकांक्षा, आवड-निवड बाजूला टाकून घरातल्या लोकांच्या सुखात सुख मानणारी अगदी साधारण बायको, सून, आई अश्या भूमिकेत माधुरी मोहक दिसते. सुमित राघवन सोबत आपल्या संसाराची गाडी सुरळीत चालवीत असताना अचानक एक ब्रेक लागतो आणि तिचे आयुष्यच बदलते.

हृदय प्रत्यारोपणामुळे ती स्वत: डोनर सईसारखी होते आणि दंगा मस्ती सुरू करते. हे परिवर्तन घडते सईच्या बकेट लिस्टमुळे… सईच्या डायरीतील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या नादात ती बाइक चालविते, पबमध्ये जाऊन फुल टू टल्ली होते, रणबीरसोबत सेल्फी घेते, शॉर्ट्स ड्रेसेस घालते आणि आजच्या पिढीप्रमाणे धमाल करते. सईची बकेट लिस्ट भरता-भरता ती स्वत:ला नव्याने सापडते.



सिनेमात माधुरी असल्यावर पूर्ण सिनेमा तिच्यावर केंद्रित असणे तर साहजिकच आहे; पण तिच्या कुटुंबातील नवरा- सुमित राघवन, सासू-सासरे म्हणून वंदना गुप्ते आणि प्रदीप वेलणकर, आई-बाबा म्हणून इला भाटे आणि दिलीप प्रभावळकर, मिलिंद फाटक, रेशम टिपणीस, सुमेध मुद्गलकर या सर्वांच्या भूमिका लहान असल्या तरी त्यांनी छान निभावल्या आहेत. सईची आई म्हणून रेणुका शहाणे पुन्हा एकदा माधुरीसोबत दिसून आली आहे आणि तिनेही आपली भूमिका ठोस बजावली आहे. शुभा खोटे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. माधुरीच्या आजेसासूच्या भूमिकेत त्यांनी कंटाळवाणी वाटायला जागी सोडलेली नाही. माधुरीचा पहिला मराठी चित्रपट म्हणून लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. तरी यात माधुरी आपल्या सर्वात दमदार भूमिकेत आहे असे म्हणता येणार नाही. दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर त्यांचा भरपूर उपयोग करू शकत होते. यात दर्शविण्यात आली, त्यापेक्षा कितीतरी अधिक दम  माधुरीच्या अभिनयात आहे, हे आपण अनेक हिंदी सिनेमात बघितलेले आहे. तरी धर्मा प्रॉडक्शनचे नाव आल्याने  व अर्थातच करण जोहरची निर्मिती असल्यामुळे सिनेमात मसाला आणि भव्यतेचा थाट दिसून येतो. तंत्र, अभिनय, कहाणी हे सिनेमाचे मजबूत पक्ष आहेत. तरी खूप काही वेगळे नाही. भावनिक असला तरी हसवणारा, करमणूक करणारा, रंगवणारा एकूणच मसालेदार असा हा सिनेमा आहे.

‘ बकेट लिस्ट’ मध्ये माधुरीला भेटण्याची इच्छा असणार्‍या प्रेक्षकांनी नक्कीच हा सिनेमा बघावा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *