मराठमोळ्या तरुणाच्या हिंमतीस प्रवीण तरडेंची दाद
मराठी मनोरंजन विश्वात आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे ओळखले जातात. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ या त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. कामाच्या व्यापातून वेळ काढत प्रवीण आवर्जून भ्रमंती करीत असतात. या भ्रमंतीवेळचे अनुभव, काही प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा परिचय समाजमाध्यमांवरून करून देत असतात.
प्रवीण आणि त्यांच्या पत्नी स्नेहल सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. प्रवीण यांनी ऑस्ट्रेलियामधून एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामधून ऑस्ट्रेलियामध्ये उद्योजक म्हणून नावारुपाला आलेल्या योगेश चव्हाण यांचा परिचय करून दिला आहे. प्रवीण यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर खूपच पसरला आहे.

ऑस्ट्रेलियात योगेश चव्हाण या मराठी मुलाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. योगेश २००१ मध्ये न्यूझीलंडहून ऑस्ट्रेलियात आला होता. योगेश हा मूळचा कऱ्हाड इथला आहे. त्याने स्वतःच्या हिंमतीवर ऑस्ट्रेलियात एक मोठा उद्योग उभारला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून योगेश महाराष्ट्रातील विविध भागांमधून येणारे खाद्यपदार्थ त्याच्या ‘स्वाद फूड्स’ च्या माध्यमातून विकतो. या माध्यमातून योगेश महाराष्ट्रातील अनेक छोट्या उद्योजकांनी तयार केलेले खाद्यपदार्थ सर्व प्रकारच्या अटी-शर्ती, नियम पाळून परदेशात आणतो आणि विकतो. गेल्या २०-२२ वर्षांपासून योगेश हा व्यवसाय करीत आहे. महाराष्ट्रातील गावागावात महिलांनी तयार केलेली थालीपिठाची भाजणी, उपवासाची भाजणी, चकलीची भाजणी, पापड, लोणची, विविध प्रकारचे मसाले, आंब्याचा पल्प असे अनेक अस्सल मराठमोळे पदार्थ ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युके अशा विविध देशांमध्ये विकतो. गेल्या २०-२२ वर्षांपासून योगेश हा व्यवसाय करीत आहे.

याच व्हिडिओमध्ये योगेश यांनी महाराष्ट्रातील घरगुती स्वरुपातील उद्योजकांना एक आवाहन केले आहे. ज्या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे, त्यांची उत्पादने परदेशात विकायची आहेत, त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी योगेश यांनी दर्शविली आहे. त्यासाठी इच्छुकांनी समाजमाध्यमावरून संपर्क साधावा, असे आवाहन योगेश यांच्यासह प्रवीण तरडे यांनी केले आहे. प्रवीण यांनी प्रसारित केलेला हा व्हिडिओ समाज माध्यमावर खूपच पसरला आहे.