दूधव्यवसायातील तंत्रज्ञान
दूध उत्पादन आणि गुणवत्तावाढीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब फायदेशीर ठरतो. विशेषतः प्रक्रिया तंत्र, वितरण व्यवस्थापन, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात फायदेशीर ठरणार आहे.
दूध उद्योग आणि पुरवठा यामध्ये ग्राहकांचा विश्वास मिळविणे महत्त्वाचे असते ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान संपूर्ण उत्पादन चक्रामध्ये दूध उद्योगातील अन्न आणि पशुधनातील उत्पादनांची नोंदणी ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

दूध उद्योगाच्या अन्नपुरवठा साखळीतील पारदर्शकता ही ग्राहकांचा विश्वास मिळविण्यासाठी फायदेशीर आहे. जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये पारदर्शकता ही विक्री व्यवस्थापनासाठी महत्त्वाची आहे. गेल्या चार वर्षात विविध उत्पादक कंपन्यांनी अन्न सुरक्षा निदान आणि प्राण्यांच्या जनुकीय तंत्रज्ञानामध्ये ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान आणण्यासाठी भागीदारी केली. अन्न उद्योगातील कंपनीला त्यांच्या अन्नपुरवठा साखळीत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे.
‘ब्लॉकचेन’ हा डिजिटल तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर कायमस्वरूपी नोंद करता येते. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण उत्पादन चक्रामध्ये दूध उद्योगातील अन्न, पशुधनातील उत्पादने आणि प्राण्यांचा इतिहास याची संपूर्ण माहिती ठेवली जाते.या तंत्रज्ञानामुळे जनावराची जनुकीय माहिती, दैनंदिन खाद्य, जनावराच्या उपचाराचा वैद्यकीय इतिहास, गोठ्याचे वातावरण, दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ता याची माहिती एकाच ठिकाणी मिळते.

‘ब्लॉकचेन’ हे तंत्रज्ञान सुरुवातीपासूनच उच्च पातळीची पारदर्शकता ठेवते.
सध्याच्या काळात दुधाच्या बाजारपेठेत दूध तसेच दुग्धजन्य पदार्थाची चव आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. अलीकडच्या वर्षात विक्री तंत्रज्ञानामध्ये विविध तांत्रिक घडामोडी झाल्या आहेत. यामध्ये दूध उत्पादनांचा पोत आणि चव सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. किण्वन कौशल्यासह विविध स्वाद निर्मितीवर विशेष संशोधन करण्यात येत आहे. यामुळे पदार्थाची चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवली जाते. दूध उद्योगांसाठी ‘डेअरी बाय नेचर’ हा एक महत्त्वाचा तांत्रिक विकास आहे, कारण ते दुग्धव्यवसायाची नैसर्गिक चव वाढवते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ताज्या उत्पादनांची वाहतूक करणे हे जगातील अनेक दुग्ध कंपन्यांसाठी आव्हान आहे. २०१९ मध्ये युरोपियन डेअरी को-ऑपरेटिव्ह संस्थेने आंतरराष्ट्रीय वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘सुपर कुलिंग’ या नवीन तंत्रज्ञानाची चाचणी सुरू केली. हे नवीन तंत्रज्ञान जागतिक डेअरी कंपन्यांसाठी स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय बाजारात उतरण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरले आहे. यामुळे दुधाची वाहतूक सुलभ आणि सुरक्षित झाली आहे.
मनुष्यबळ, वेळेची बचत आणि योग्य पद्धतीने अधिक क्षमतेने गाईचे दूध काढण्यासाठी ‘रोबो’ तंत्रज्ञानाचा वापर परदेशामध्ये केला जातो. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाळ गाईंचे संगोपन केले जाते तेथे या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरले आहे.