हवाई सेविका बनायचे आहे
‘हवाई सेविका’ विषयी मुलींना फार कुतूहल असते. त्यांचे दिसणे, बोलणे, राहणीमान अशा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे ‘हवाई सेविका ‘ बनणे हे हजारो मुलींचे स्वप्न असते. ‘हवाई सेविका ‘ ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही उत्तम नोकरी आहे. ‘हवाई सेविका ‘ ची मागणीही वाढत आहे. ‘हवाई सेविका ‘ होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? त्यांना किती पगार मिळतो? याचा सर्व तपशील जाणून घेऊया.

सर्वप्रथम ‘हवाई सेविका’ प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची किमान ५ फूट २ इंच असावी. उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. उमेदवाराचे वय १७ ते २६ वर्षांदरम्यान असावे. अर्जाच्या वेळी अविवाहित उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. ‘एअरलाइन्स’ तर्फे या पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात येते. लेखी चाचणी, गटचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते.

‘हवाई सेविका ‘ होण्यासाठी तुम्ही यासंबंधीत प्रशिक्षण घेऊ शकता. त्यासाठी पदवी, पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बारावीनंतर हे अभ्यासक्रम करता येतात. प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते एक वर्षाचा असू शकतो. पदवी अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचा असतो. नवीन ‘हवाई सेविके’ ला सुरुवातीला सरासरी चार ते पाच लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. जसजसा अनुभव वाढत जातो, तसतसा तो १३ ते १५ लाखांपर्यंत पोहोचतो.
प्रवाशांना अभिवादन करणे, त्यांना जागेवर बसण्यासाठी मार्गदर्शन करणे, उड्डाणादरम्यान प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरविणे, अहवाल तयार करणे, आवश्यक असल्यास प्रवाशांना वैद्यकीय सेवा पुरविणे,
प्रवाशांना सुरक्षिततेच्या प्रक्रियेबद्दल सूचना देणे ही कामे ‘हवाई सेविके’ स करावी लागतात.