खासगी शाळांसाठी नियमावली
शैक्षणिक नववर्षाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील खासगी शाळांच्या विरोधात येणाऱ्या तक्रारी पाहता शिक्षण विभागाने खास नियमावली तयार केली आहे. शाळांनी दिलेल्या आदेशाचे आणि नियमांचे पालन करावे, यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व खासगी शाळांना दक्षता घेण्याची सूचना केली आहे. शहरातील खासगी शाळांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागात तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारींमुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. या तक्रारी येऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने खबरदारी म्हणून नियमावली तयार केली आहे.

‘शालेय व्यवस्थापनाने नियमापेक्षा जास्त फी आकारू नये, शिक्षक-पालक संघाची सभा वेळेवर आयोजित करावी, पालकांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, फी संदर्भात सविस्तर तपशील शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात यावा, पालकांना शाळेतून गणवेश व पाठ्यपुस्तके खरेदी करण्यासाठी सक्ती करू नये,’ असे महापालिकेने शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. इंग्रजी शाळेत मराठी विषयही शिकवावा, तसेच विद्यार्थी आणि पालकांना शाळेत सन्मानाची वागणूक मिळावी, असेदेखील सांगण्यात आले आहे.
