बाजरीच्या पौष्टिक वाणांचा प्रसार
‘संभाजीनगर’ येथील अखिल भारतीय समन्वयित बाजरी संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित बाजरीच्या लोह व जस्ताने युक्त दोन वाणांचा देशभरात प्रसार होत आहे. सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य-भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाते आहे. याच धान्यामधील महत्त्वाचे पीक म्हणजे बाजरी आहे. अवर्षणप्रवण भागात येणाऱ्या व शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक असलेल्या बाजरीचा क्षेत्र विस्तार व मूल्यवर्धनासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात औरंगाबाद, नगर, धुळे, पुणे, सोलापूर, बीड आणि नाशिक जिल्ह्यांत या पिकाची सर्वाधिक लागवड पाहण्यास मिळते. अलीकडील काही वर्षांत नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यामुळे उच्च पोषणतत्त्वे असूनही भरडधान्यांखालील क्षेत्र घटले; मात्र नवे संशोधन, तंत्र व वाण व ग्राहकांकडून होणारी मागणी याद्वारे बाजरीसारख्या पिकाला पुन्हा चांगल्या प्रकारे चालना मिळू लागली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत ‘संभाजीनगर’ येथे अखिल भारतीय समन्वयित बाजरी संशोधन प्रकल्प कार्यान्वित आहे.

येथील शास्त्रज्ञांनी जोधपूर येथील प्रकल्प केंद्र आणि इक्रिसॅट-हैदराबाद यांच्यासोबतच्या संयुक्त संशोधनातून बाजरीचे दोन जैवसंपृक्त संकरित वाण विकसित केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर त्यांची शिफारस झाली आहे. ‘एएचबी-१२००’ हे वाण २०१८ मध्ये प्रसारित झाले. ‘एएचबी-१२६९’ हे वाण २०१९ मध्ये प्रसारित झाले. ते ‘गोसावी’ व ‘करपा’ रोगास प्रतिकार करते.
या दोन्ही जैवसंपृक्त वाणांची खरीप हंगामासाठी शिफारस झाली आहे. उन्हाळी हंगामासाठी अद्याप शिफारस नसली, तरी सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांकडे या वाणांच्या चाचण्या उन्हाळी हंगामासाठी सुरू आहेत. या दोन्ही वाणांचे पीक खरीप हंगामात शेतकऱ्यांकडे घेण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात या वाणांचा उपयोग शेतकऱ्यांना करता येईल.