सर्जनशील व्यवसाय फॅशन डिझाईन
‘फॅशन डिझायनर’ हा शब्द कानावर आल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर नवीन-नवीन प्रकारचे कपडे, त्याचे खूप प्रकार दिसतात. ‘फॅशन डिझायनिंग’ म्हणजे नुसते कपडे शिवणे नव्हे; तर विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार वापरणे, नक्षीकाम करणे, रंगसंगती, जरीवरील कलाकुसर या सगळ्याचा समावेश ‘फॅशन डिझायनिंग ‘ मध्ये होतो.

‘फॅशन डिझाईन’ ही एक प्रकारची कला आहे, जी कपडे आणि संबंधित असणाऱ्या इतर आवश्यक साधनांच्या निर्मितीसाठी वापरली जाते. अभ्यासाचे शैक्षणिक क्षेत्र म्हणून ‘फॅशन डिझाइन’चा अनेक विषयांमध्ये विस्तार झाला आहे. एक व्यवसाय म्हणून आज ‘फॅशन डिझायनर’ नवीन प्रचलित ‘ट्रेंड’ नुसार काम करतात किंवा स्वत: नवीन ‘ट्रेंड’ निर्माण करतात, ‘फॅशन डिझायनर’ ग्राहकांच्या मागणीनुसार किंवा त्यांच्या सर्जनशील दृष्टीच्या आधारे वस्त्रे तयार करतात. ग्राहक त्या ‘डिझाइन्स’ना प्रतिसाद देतात. त्यामुळेच बाजारामध्ये एक नवीन ‘ट्रेंड’ निर्माण होतो.
विशेषत: कपडे, पादत्राणे, उपकरणे, मेकअप, यांचा यात समावेश असतो. एखादी व्यक्ती ज्या शैलीत कपडे घालते, त्या शैलीमध्ये फॅशन हा एक विशिष्ट आणि अनेकदा नेहमीचा ‘ट्रेंड’ आहे. फॅशन डिझायनिंगकडे आपण एक करिअर संधी म्हणूनही पाहू शकता. आज रोज नवनवीन ‘ट्रेंड’ बाजारामध्ये येत आहेत. या ‘ट्रेंड’ नुसार आपण याची सुरुवात केल्याने आपल्याला भविष्यात चांगला फायदा नक्कीच मिळू शकतो.

‘फॅशन डिझाइन’ चे प्रशिक्षण घेतल्याने नोकरीची शक्यता वाढते. 2022 ते 2026 पर्यंत ‘फॅशन डिझायनर्स’साठी नोकरीच्या संधी 3% ने वाढण्याची अपेक्षा आहे. अंदाज कालावधीत, किरकोळ व्यापार उद्योगातील ‘फॅशन डिझायनर्स’ची व्याप्ती अंदाजे 22% वाढण्याची अपेक्षा आहे. ‘फॅशन डिझायनिंग’ चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसर्या डिझायनरच्या हाताखाली काम करण्याची गरज भासणार नाही. आपण स्वत: आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. यात नाविन्यपूर्णता, ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीविषयी आपणांस माहिती असायला हवी.
‘फॅशन डिझायनर’चे भारतातील सरासरी वेतन रु. 5,25,720 आहे, जे भारतातील राष्ट्रीय सरासरी वेतनापेक्षा 36% अधिक आहे. ‘फॅशन डिझायनर’चा सरासरी वार्षिक पगार रु. 65,000 आहे. ‘फॅशन डिझाइन’मध्ये काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा असल्यामुळे, ‘फॅशन डिझायनर्स’ साठी कामाचे वातावरण नेहमीच सर्जनशील असते. इतर व्यवसायांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी दबाव असतो.
यासाठी आपल्याला मान्यताप्राप्त बोर्डाची किमान 50% गुणांसह इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. नंतर उमेदवार युजी आणि पीजी ‘फॅशन डिझायनिंग’ कोर्सेसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी एनआयएफटी, एनआयडी, सीईईडी आणि युसीईईडीसारख्या ‘फॅशन डिझाइन’ प्रवेश परीक्षांना बसू शकतो. पात्रता आवश्यकता पूर्ण करण्याव्यतिरिक्त, सर्जनशील क्षमता आणि कपडे आणि उपकरणे तयार करण्याची इच्छा असलेल्या उमेदवाराने ‘फॅशन डिझायनिंग’ प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावा. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’ सारख्या आघाडीच्या ‘फॅशन डिझाईन’ संस्थांचे स्वतःचे पात्रता निकष आणि प्रवेश प्रक्रिया यांची माहिती करून घ्यावी.