
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कमाई पाहता चित्रपटा लवकर १०० कोटी रुपये कमावणार असल्याचे म्हटले जात आहे.
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा ‘तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट होळी आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी देखील या चित्रपटाचे खुप कौतुक केले आहे. या बॉलिवूड चित्रपटाच्या आगाऊ नोंदणीला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या आकड्यांवरूनच चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’ वर धुमाकूळ घालणार हे स्पष्ट झाले होते. आता चित्रपटाची कमाई समोर आली आहे.

‘झुठी मैं मक्कार’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या ‘विकेंड’ला ७० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतात १५.७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आठव्या दिवशी म्हणजेच १५ मार्च रोजी चित्रपटाने ५.६० कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. त्यामुळे चित्रपटाने आतापर्यंत एकूण ८७.९१ कोटी रुपये कमावले आहेत. ‘विकेंड’ला चित्रपट पुन्हा चांगली कमाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपट १०० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. यापूर्वी त्याने ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा २’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’सारखे प्रणय- विनोदी शैलीचे चित्रपट केले होते, जे पडद्यावर ‘हिट’ ठरले होते. आता लव रंजनने रणबीर आणि श्रद्धाच्या या चित्रपटाच्याबाबतीतही असेच काहीसे केले आहे. रणबीर आणि श्रद्धाची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहे. दोघांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच आहे.