
गुढीपाडवा साजरा करण्यासाठी काही खास महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ घरी आवर्जून करायलाच हवेत.
मसालेभात :
साहित्य :- तेल – ३ ते ४ मोठे चमचे, मोहरी – १ मोठा चमचा, जिरे-१ मोठा चमचा, हिंग – चिमूटभर, कढीपत्ता – ५ ते ६ पाने, दालचिनी – २ ते ३ काड्या, तमालपत्र – १ ते २ पाने, लवंग – ५ ते ६ ,काळी मिरी – ५ ते ६ , कांदा – १ कप, हिरव्या मिरच्या – २ ते ३ (बारीक चिरून घेतलेल्या), गाजर – १ कप (उभे चिरुन घेतलेले), आले-लसूण वाटण – १ मोठा चमचा, तोंडली – १ कप (उभी चिरुन घेतलेली), बटाटे – १ कप, फ्लॉवर – १ कप , टोमॅटो – १ कप , हिरवे मटार – १ कप , हळद – अर्धा मोठा चमचा, मीठ – चवीनुसार , लाल मिरची पावडर – १ मोठा चमचा, बासमती तांदूळ – २ कप , कोथिंबीर – १ मोठा चमचा, (बारीक चिरुन घेतलेली), खोबरे – १ ते २ मोठे चमचे, लिंबाचा रस – २ मोठे चमचे काजू – ७ ते ८ , गरम पाणी – ३ कप, काळी वेलची – १, गोडा मसाला – १ मोठा चमचा.

कृती :-
एका भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, दालचिनी, काळी वेलची, काळीमिरी, लवंग, तमालपत्र, काजू घालून घ्यावेत. त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा, आले-लसूण वाटण, हिरवी मिरची, गाजराचे उभे चिरलेले काप, फ्लॉवरचे तुकडे, तोंडली घालून सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. आता या मिश्रणात हळद, लाल मिरची पावडर, हिरवे मटार, टोमॅटो घालून घ्यावेत. आता या भांड्यावर झाकण ठेवून या सर्व भाज्या थोडा वेळ वाफेवर शिजवून घ्याव्यात. भाज्या थोड्या शिजवून घेतल्यानंतर त्यात हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
मसालेभाताचा सगळा मसाला तयार झाल्यावर आता त्यात तांदूळ घालावा. तांदूळ घातल्यानंतर भाज्यांचा मसाला व तांदूळ एकजीव करुन घ्यावे. सर्व जिन्नस एकत्रित करुन झाल्यानंतर त्यात गरम पाणी घालावे. आता गॅस मंद आचेवर ठेवून गॅसवर एक खोलगट तवा ठेवावा. त्या तव्यांवर मसाले भाताचे पातेले ठेवून ते पातेले झाकून ठेवावे.
भात संपूर्णपणे शिजल्यानंतर त्यावरुन थोडाशी कोथिंबीर, किसलेले खोबरे भुरभुरून घ्यावे व लिंबाचा रस चमच्याने घालावा. आपला पारंपरिक मसालेभात खाण्यासाठी तयार आहे. दही व काकडीची कोशिंबीर, पापड, मठ्ठा, लोणचे यांसोबत आपण हा मसालेभात खाण्यास देऊ शकता.