व्यवसायातील यशस्विततेसाठी
कोणताही धंदा किंवा उद्योग लहानमोठा नसतो. तो उत्तमरित्या चालविण्यासाठी सर्व प्रकारचे न्युनगंड बाजूला सारून जे गरजेचे आहे, ते सर्व करण्याची आपली तयारी पाहिजे. आपणात प्रचंड आत्मविश्वास आहे, तरीही धंदा चांगला चालत नाही? कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड आपण मनात बाळगत नाही, तरीदेखील धंदा वाढत नाही ? धंदा वाढविण्यासाठी उपाय काय करावे ? व्यवसाय कसा वाढवावा ? व्यवसाय कसा करावा ? असे एक ना अनेक प्रश्न पडतात, होय नं? धंदा वाढविण्यासाठी उपाय म्हणून आपला व्यवसाय डिजिटल करा. आताचा काळ डिजिटल आहे. बदलत्या काळानुसार आपल्या व्यवसायातील काही गोष्टीदेखील बदलणे गरजेचे आहे.आता लोक दुकानात जाण्यापेक्षा घरात बसून वस्तू खरेदीवर जास्त भर देतात.

व्यवसाय डिजिटल करण्यासाठी आपल्या व्यवसायाचे संकेतस्थळ बनवा. आता लहान-मोठ्या सगळ्याच उद्योगांचे संकेतस्थळ आहे. आपला व्यवसाय लहान आहे, मग संकेतस्थळ कशाला बनवायचे, असा विचार करू नका. तुमचा व्यवसाय कसलाही असु द्या, त्याचे जर संकेतस्थळ असेल तर त्याची एक वेगळीच छाप आपल्या गिऱ्हाईकावर सोडण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. संकेतस्थळ बनविण्यासाठी कोणा वेब डिजाईनरकडे जाण्याची गरज नाही. आपण स्वतः कमी पैशात आणि घरबसल्या देखील चांगले संकेतस्थळ बनवू शकता. ‘गो डॅडी’,’बिगरॉक’ सारख्या संकेतस्थळाचा वापर करून आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायाचे उत्तम संकेतस्थळ बनवू शकता.
हल्लीच्या युगात प्रत्येकजण समाजमाध्यमांचा वापर करीत आहे. आपले जवळपास सर्वच ग्राहक हे समाजमाध्यमांचा वापर करीत असतील, तर यावर जाहिरात केल्याने आपणांस नक्कीच फायदा होऊ शकतो. आपण आपल्या व्यवसायाच्या नावाने फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर वर खाते खोलले पाहिजे. ते रोजच्या रोज हाताळले पाहिजे. असे केल्याने आपण आपल्या ग्राहकाच्या कळत नकळत संपर्कात असता. ज्याचा निश्चित परिणाम आपल्या व्यवसायवृद्धी मध्ये होतो. आपल्या व्यवसायाचे व्हिडिओ जास्त करून समाजमाध्यमांवर शेअर करा.

आपल्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल हा चांगल्या गुणवत्तेसोबतच स्वस्त देखील असला पाहिजे. अश्या प्रकारचा माल हा तुम्ही जिथे हा माल बनविला जातो, तिथूनच जर होलसेल किंमतीमध्ये विकत घेतला तर तुमचा नफा नक्की वाढेल. फक्त आपल्या ग्राहकाला विकलेल्या उत्पादनातूनच नाही, तर तुम्ही विकत घेणाऱ्या कच्च्या मालावर देखील आपण नफा वाढवू शकता.
गिऱ्हाईकासोबतची आपली वागणूक धंदा वाढविण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय ठरतो. आपण आपल्या गिऱ्हाईका सोबत कायम अदबीने वागले पाहिजे. आपले उत्पादन किंवा सेवा विकण्याच्या आधी आणि विकल्यानंतर पण आपण त्यांच्यासोबत अदबीनेच बोलले आणि वागले पाहिजे. असे केल्यास ते आपणास कायम लक्षात ठेवतील. आपल्या व्यवसायाचा तोंडी प्रचारदेखील करतील. त्यांचे काम एक वेळ थोडे उशिरा झाले तरी चालेल पण त्यांच्यासोबत आपण नम्रतेनेच बोलले पाहिजे.
व्यवसाय यशस्वी करण्यासाठी पुढील ३ महत्वाच्या गोष्टी आवर्जून करा .
आपला व्यवसाय डिजिटल करा.
कच्च्या मालातील नफा वाढवा.
गिऱ्हाईकासोबतची आपली वागणूक व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्वाची असते.