कोरीगड किल्ला

‘कोरीगड’ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. गडाला चहूबाजूंनी तटबंदी आहे. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.

११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली. या गडावर ‘कोराई’ देवीचे मंदिर आहे. गडाची देवता ‘कोराई’ ही प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे. गडावरील एकूण सहा तोफांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे.

गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच ‘गणेश टाके’ म्हणतात. गडावर जायचे दोन मार्ग आहेत. उगवतीकडची राजवाट सोपी आहे; तर सूर्यास्ताकडची वाट अवघड आहे. पूर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक ‘दुघई’ गुहा व श्री गणेशाची मूर्ती आहे. थोडी वर चढाई केल्यास प्रवेशद्वाराला नवीन लाकडी दरवाजा लावला आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात. लोणावळ्यापासून २५ कि. मी. वर येथे खासगी वाहनाने जाता येते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *