जीवनात मैत्री असावीच

चांगल्या लोकांशी मैत्री करणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहे. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे, की वास्तविक जीवनात मित्रांसोबत बोलणे, समस्या सांगणे आणि अगदी मनमोकळ्या चर्चा करणेदेखील आरोग्यासाठी चांगले असते.

मित्र- मैत्रिणींसोबतचे तुमचे बंध मजबूत करा. कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली होती. ती अजूनही संपलेली नाहीत. अशा परिस्थितीत, आपले खरे मित्रमैत्रिणी आणि प्रियजनांशी जोडलेले राहणे अधिक महत्त्वाचे आहे. संतुलित, पौष्टिक आहार, व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन हे निरोगी राहण्याचे मार्ग आहेत, हे तर आपल्याला ठाऊक असते; परंतु आपल्या आयुष्यात सुख-दुःख वाटून घेण्यासाठी चांगले मित्रमैत्रिणी असतील तर आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लांब राहत असल्याने क्वचित भेट होत असली तरी वेळेला आपल्याबरोबर आपले मित्र मदत करायला नक्की येतील, या भावनेनेही धीर वाढतो. निराश वाटत असताना तुमच्या मनातील गोंधळ दूर करून सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी मित्र तुम्हाला प्रेरणा देतात, तर कधी तुम्ही आजारी असताना किंवा अडचणीत असताना सतत लढायला प्रवृत्त करतात.

एकवेळ रक्ताचे नातेवाईक कधीतरी स्वार्थीपणाने वागतात; परंतु चांगले मित्र कायम आपल्या पाठीशी उभे राहतात. एखादी समस्या तुम्ही तुमच्या कुटुंबासमोर मांडू शकत नाही, ती तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला सांगतात. तुमचा मित्र तुमचे म्हणणे ऐकून आणि समजून घेतो, इतकेच नाही तर समस्येवर उपायही सांगतो, असा अनुभव आपणही घेतला असेल.

कठीण काळात मित्रांसोबत राहिल्याने माणसाला मानसिक बळ मिळते. जिवलग मित्र तुमचा तणाव दूर करण्यात मदत करतात. सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून तुम्हाला तणावातून बाहेर देखील काढतात. यामुळेच मित्रांच्या सहवासात तुम्हाला आनंद वाटतो. चांगली मैत्री माणसाला आयुष्यात भक्कम आधार देण्याचे काम करते. हेही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे की, तुमची मैत्री कशी आहे किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही मित्र किंवा मैत्रीण म्हणून निवडले आहे ती व्यक्ती कशी आहे ! जर एखादा चांगला आणि समजूतदार मित्र तुम्हाला मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यास मदत करू शकतो, तर एक स्वार्थी आणि धूर्त व्यक्ती मैत्रीचा गैरफायदा घेऊन तुम्हाला शारीरिक आणि मानसिक वेदना देऊ शकतो. त्यामुळे मैत्री करताना थोडी काळजी घ्या. तुम्ही मित्र किंवा मैत्रीण म्हणून कोणाला निवडता ही निवड सर्वस्वी तुमची आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *