तळलेली भरली मिरची

साहित्य :
२५० ग्रॅम लांब किंवा बुटक्या जाड अशा हिरव्या मिरच्या, २ कप अर्थात १८० ग्रॅम किसलेले ओले खोबरे, २ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, १ लिंबाचा रस, दीड लहान चमचे हळद, पाव लहान चमचा हिंग, चवीपुरते मीठ, अर्धा कप बेसन ( चण्याचे पीठ )

कृती:
प्रथम मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या फडक्याने पुसून घ्याव्यात. मिरच्यांच्या मधोमध देठापासून ते टोकापर्यंत एक लांब चीर पाडून घ्यावी. देठ तुटू देऊ नये.

एका मोठ्या पातेल्यात किसलेले खोबरे , हळद , हिंग , कोथिंबीर आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात लिंबाचा रस घालून चांगले ढवळून घ्यावे.

आता त्यात बेसन घालून एकत्र मिसळून घ्यावे; जेणेकरून आपल्याला ते मिरच्यांमध्ये भरता येईल.

हे सारण मिरच्यांमध्ये दाबून भरावे; परंतु जास्त भरून मिरच्या तुटू देऊ नयेत. नाही तर त्या तेलात सोडताक्षणीच पसरतात.

एका पसरट तव्यावर ४-५ मोठे चमचे तेल गरम करावे. तेल चांगले गरम झाले की उष्णतेची आच मंद करून हळूच मिरच्या तेलात सोडाव्यात. व्यवस्थित कडा पालटून खरपूस तळून (शॅलो फ्राय ) घ्याव्यात.

या मिरच्या गरमागरम कढी-भात, कोकम सार-भात किंवा आमटीसोबत वाढाव्यात.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *