विद्येचे माहेरघर पुणे

महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. समृद्ध इतिहास आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेले हे शहर पर्यटकांचे मनोरंजन करण्यात कधीही अपयशी ठरत नाही. निसर्गानेही पुण्यावर कृपा केली आहे, हे येथील नयनरम्य स्थळांकडे बघून लक्षात येते.

पुण्याला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ असेही म्हटले जाते; कारण पुण्यात प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. ‘शनिवारवाडा’, ‘पर्वती टेकडी’, ‘आगाखान पॅलेस’, ‘वेताळ टेकडी’, ‘पाषाण तलाव’, ‘शिंदे छत्री’, ‘मयूर खाडी’, ‘ओशो आश्रम’, ‘खडकवासला धरण’, ‘राजमाची’, ‘मुळशी’ तलाव आणि धरण, ‘दगडूशेठ हलवाई’ मंदिर, ‘नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी’ आणि इतर बरीच प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुण्यात आहेत.

‘शनिवारवाडा’ हे पुण्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानले जाते. ही एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूदेखील आहे. या भव्य तटबंदीमध्ये दिवाणखाना, जुना आरसा महाल आणि अनेक आकर्षक इमारती आहेत. पेशव्यांच्या या पूर्वीच्या निवासस्थानाचे सौंदर्य पुण्यातील मोठे आकर्षण आहे.’दगडूशेठ हलवाई’ गणेश मंदिर हे पुण्यातील धार्मिक पर्यटन स्थळ असून भाविकांचा आकर्षण बिंदू आहे. हे मंदिर दररोज सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत उघडे असते. खास करून गणेशोत्सवात तर याठिकाणी भेट द्यायलाच हवी. संपूर्ण मंदिराची रचना इतकी सुंदर आहे, की केवळ भाविकांनाच नाही तर इतरांनाही ते आकर्षक वाटेल.

‘वेताळ टेकडी’ हे पुण्यातील आणखी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ‘वेताळ’ टेकडीच्या माथ्यावरून संपूर्ण पुणे शहर आपन पाहू शकतो. याठिकाणचे निसर्गसौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे. येथे अनेक विदेशी प्रजातींचे वृक्ष आणि इतर उपक्रमही पहायला मिळतात. ‘लाल महाल’ ज्याला ‘रेड पॅलेस’ म्हणूनही ओळखले जाते, हे पुण्यातील एक पर्यटनस्थळ आहे, ज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी इ. स.1630 मध्ये केली होती. याच महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती.

‘पाषाण तलाव’ हे पुण्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. पुण्यापासून १२ किमी अंतरावर ‘पाषाण’ टेकडीच्या जवळ ब्रिटीश काळात बांधलेला हा एक कृत्रिम तलाव आहे. हा तलाव म्हणजे हिवाळ्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ हे एक मनमोहक ठिकाण येथे आहे, जिथे भारताच्या मध्ययुगीन इतिहासाची माहिती मिळते. या संग्रहालयात 14 व्या शतकातील अनेक शिल्पे, वाद्ये, युद्ध शस्त्रे तसेच हस्तिदंत, चांदी आणि सोन्याच्या वस्तू आहेत , ज्या पाहताच मोहून टाकतात. दुर्मिळ वस्तूंचा अनोखा संग्रह बघण्यासाठी येथे अनेक लोक भेट देतात.

येथील वैशिष्ट्यपूर्ण ‘पर्वती’ टेकडी मनमोहक आहे. पेशव्यांच्या काळात येथे बांधलेली मंदिरे, पायथ्याशी असणारी प्राचीन लेणी आणि टेकडीवरील नानासाहेब पेशव्यांचे स्मारक मन लुब्ध करते. हे ठिकाण पुण्यातील सर्वोत्तम ‘सूर्यास्त बिंदू म्हणूनही ओळखले जाते. येथून जवळच पेशवे संग्रहालय आहे. महादजी शिंदे यांचे स्मारक म्हणून बांधले गेलेले पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘शिंदे छत्री’ होय. येथील ‘अँग्लो राजस्थानी शैलीचा’ स्पर्श असलेले नक्षीकाम लोकांना आकर्षक वाटते. या वास्तूमध्ये पिवळ्या दगडात केलेले सुंदर कोरीवकाम बघायला मिळते.

पुणे शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या, ‘खडकवासला’ धरणामध्ये ‘खडकवासला तलाव’ हा एक सुंदर तलाव आहे, जो शहर आणि त्याच्या उपनगरांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे.’सिंहगड’ किल्ला हा येथील प्रमुख आकर्षण बिंदू आहे. सिंहगड किल्ला सह्याद्रीच्या ‘भुलेश्वर’ पर्वतरांगेतील एका उंच कड्यावर आणि पुण्यापासून सुमारे 25 किमी अंतरावर बांधलेला आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या व त्यांच्याबरोबरच्या सर्व मावळ्यांच्या बलिदानाने हा किल्ला पवित्र झाला आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *