कोबीवर्गीय भाज्या
‘पानकोबी’ व ‘फुलकोबी’ ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यात या पिकांची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये ‘पान कोबी’ पिकाची अंदाजे 7203 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. ‘फुलकोबी’ पिकाची अंदाजे 7000 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकांमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, चुना, सोडीयम, लोह ही खनिजद्रव्ये असून ‘अ’ ब ‘क’ ही जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे या भाजीपाला पिकांना आहारात महत्त्व आहे. या पिकांना हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते.

‘ फुलकोबी’ च्या जाती तापमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांची निवड त्या-त्या हवामानाच्या गरजेनुसार करावी. रेताड ते मध्यम काळी निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीस योग्य आहे. या पिकांची लागवड सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात करतात. हेक्टरी 0.600 ते 0.750 किलो बियाणे लागते. या पिकांची रोपे गादी वाफ्यावर तयार करतात. बियाणे पातळ पेरावे लागते. बियाणे मातीने अलगद झाकावे. बियांची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. बी पेरल्यापासून 4 ते 5 आठवड्यात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीपूर्वी ‘सरी वरंबे’ अथवा ‘वाफे’ यांना खतांची मात्रा द्यावी.
‘पानकोबी’ पिकास लागवडीपूर्वी हेक्टरी 80 किलो नत्र, 80 किलो स्फूरद व 80 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्याने 80 किलोचा नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. ‘फुलकोबी’साठी 75 किलो नत्र, 75 किलो स्फूरद आणि 75 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्याने 75 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी आाणि नंतर पुरेसा ओलावा राहील, अशा अंतराने जमिनीचा मगदूर पाहून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ‘पानकोबी’ व ‘ फुलकोबी’चे गड्डे निघू लागल्यापासून गड्ड्यांची वाढ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावे. नंतर हलकेसे पाणी द्यावे.

कोबीवर्गीय भाज्यांना ‘मावा’, ‘तुडतुडे’, ‘ फुलकिडे’, ‘कोबीवरील अळी’, ‘कॅबेज बटरफ्लाय’ अशा विविध किडींचा तसेच ‘ब्लॅक लेग’, ‘क्लब रूट’, ‘घाण्या रोग’, रोपे कोलमडणे, ‘लिफ स्पॉट’ या रोगांचा प्रादुर्भाव होतो. जातीपरत्वे कोबी अडीच ते 3 महिन्यात तयार होतो. तयार गड्डा हातास टणक लागतो. तयार गड्डा जादा काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्यावर तो फूटून नुकसान होण्याचा संभव असतो. म्हणून तो वेळीच काढून घ्यावा. ‘ फुलकोबी’ चा गड्डा पिवळसर पडण्यापूर्वी काढावा. कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर ‘फुलकोबी’चे 100 ते 200 क्विंटल हेक्टरी उत्पादन घेता येते.