राणीहाराची परंपरा आजही कायम

महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने ! चेहर्‍यावरील मेकअप, केशरचना आणि साड्यांसह दागिन्यांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीचा दागिन्यांचा ‘सेट’ हा असतोच. कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हेदेखील ती ठरवत असते. तसे तर आज काल बाजारात विविध प्रकारचे आकर्षक दागिने दिसून येतात; परंतु काही पारंपरिक दागिने मात्र आजही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. सगळ्यात लक्ष वेधून घेणारा दागिना म्हणजे ‘राणीहार’ ! अर्थात ‘राणीहार’ म्हटले की आपल्यासमोर पूर्वीच्या राण्यांच्या प्रतिमा उभ्या राहतात. आजही अनेक नववधू लग्नामध्ये ‘राणीहार’ घालण्याला प्राधान्य देतात.

हा ‘राणीहार’ कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानातून विकत घेऊ शकता. ‘राणीहार’ हा खरे तर राजस्थानी संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो. राजस्थानच्या राजघराण्यातील महिला आपल्या श्रृंगारात या हाराचा समावेश करून घेत होत्या. कोणत्या शतकात या हाराची निर्मिती झाली अथवा कोणत्या राणीने सर्वात पहिल्यांदा या हाराचा उपयोग केला, हे सांगणे तसे कठीण आहे; मात्र, आजही राजपूत घराण्यात अशा पद्धतीचे ‘राणी हार’ घालण्याची परंपरा कायम आहे. अनेक घरात पिढ्यानपिढ्या हा हार जपत असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या काळी हा हार राणी घालत असल्यामुळेच याला ‘राणी हार’ असे नाव प्राप्त झाले. मोती अथवा रत्नांनी हा हार पूर्वीपासून तयार करण्यात येतो. किमान तीन ते चार लड असणारा हा ‘राणीहार’ अत्यंत सुंदर दिसतो आणि मोठा असतो.

आजच्या काळात यामध्ये अनेक बदलही झालेले दिसून येतात. मुख्यत्वे आता केवळ श्रीमंत घराण्यातील महिलाच नाही, तर अगदी मध्यमवर्गीय महिलाही अशा पद्धतीचा ‘राणीहार’ आपल्या दागिन्यांमध्ये समाविष्ट करून घेतात. आता यातही नवे ‘ट्रेंड’ येताना दिसतात. तुम्हाला ‘चोकर’ सह जास्त लड असणारा ‘राणीहार’ मिळू शकतो. तसेच तुम्ही एखाद्या भरजरी साडी अथवा भरजरी लेहंग्यावर याचा वापर करू शकता . 5 लड असणारा ‘राणीहार’ही उपलब्ध असतो. हा तुम्ही ‘व्ही’ नेकलाईनच्या ब्लाऊजवर घालू शकता. साधारणतः 3-5 लड असणारे ‘राणी हार’ तुम्हाला सोनाराच्या दुकानात अथवा बाजारात ‘इमिटेशन ज्वेलरी’मध्ये उपलब्ध होतात. जे तुम्ही भरजरी साड्या अर्थात ‘कांजीवरम’ साडी, ‘बांधणी’ अथवा ‘बंधेज’ साडी, ‘लहरिया’ साडी, लेहंगा यासह परिधान करू शकता.

राणीहार हा रत्न, मोती आणि वेगवेगळ्या खड्यांनी तयार करण्यात येतो. याची मूळ किंमत ही लाखोंच्या घरात असते. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ‘राणीहार’ तयार करून घेऊ शकता. तुम्हाला ‘आर्टिफिशियल’ अथवा ‘इमिटेशन’ राणीहार हवा असेल, तर तो बाजारामध्ये साधारणतः 500 रूपयांपासून ते तुमच्या खिशाला परवडेल अशा किंमतीपर्यंत मिळू शकतो. तुम्हाला वेगवेगळ्या ‘डिझाईन्स’ आणि तुमच्या आवडत्या खड्यांमध्येही राणीहार मिळू शकतात. तुम्ही तुमच्या लेहंगा आणि साडीच्या रंगाप्रमाणे याची खरेदी करू शकता.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *