
अंगातून उन्हाच्या धारा वाहत आहेत. प्रचंड उकाड्याने हैराण होऊन आपण घरात पाऊल ठेवत आहोत. पाणी प्यायलो; पण वेगळे काहीतरी मस्तपैकी गारगार पेय हवे आहे. चला तर मग, बनवूया, अननस थंडाई !
लागणारे साहित्य : १ वाटी अननसाचे चौकोनी तुकडे , अडीच कप अननसाचे तयार सरबत, ३ मोठे चमचे खसखस,
१०० ग्रॅम बदाम, ६ मोठे चमचे साखर, बर्फाचा चुरा, पाणी.

कृती : खसखस दहा ते बारा तास आधी भिजवून घ्यावी. आता बदामाची साले काढून घ्यावीत. त्यानंतर ५० ग्रॅम बदाम आणि खसखस एकत्र वाटून घ्यावे. उरलेल्या ५० ग्रॅम बदामाचे पातळ काप करून घ्यावेत. वाटलेल्या मिश्रणात पाच ग्लास पाणी घालून ते गाळून घ्यावे. आता या पाण्यात अननसाचे सरबत व साखर घालून हे मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून काढावे. त्यात अजून १ ग्लास पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आयत्या वेळी अननसाचे तुकडे व बर्फाचा चुरा घालून ‘अननस थंडाई’ पिण्यास घ्यावी.