मल्हारगड

महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेले ‘सोनोरी’ हे या गडपायथ्याचे गाव पुण्याहून ३० किमी अंतरावर तर सासवडहून ६ किमी अंतरावर आहे. या मार्गाने गाडी थेट गडाच्या पायथ्याशी जाते. गड आकाराने लहान आहे. गडाच्या महादरवाजातून आत शिरल्यावर समोर पहारेकऱ्यांच्या देवड्या व दोन तटबंदीमधून गडात शिरणाऱ्या पायऱ्या दिसून येतात. या पायऱ्या चढून वर गेल्यावर मध्यम आकाराचा चौथरा व त्यासमोर बालेकिल्ल्याची तटबंदी दिसते. या तटबंदीच्या उजव्या बाजूस बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे.

चौथऱ्याच्या पुढे काही अंतरावर एक कोरडी पडलेली विहीर आहे. विहिरीकडून तटाच्या बाजूने पुढे आल्यावर समोर पायऱ्या असलेले बांधीव तळे लागते. तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. तलावाच्या पुढील भागात बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर दुसरी विहीर आहे. या विहिरीत काही प्रमाणात पाणी आहे. विहिरीच्या पुढील बाजूस चोरदरवाजा आहे. काळेवाडी अथवा झेंडेवाडी गावातून आल्यास या चोर दरवाजाने गडावर प्रवेश केला जातो. येथून जाताना वाटेत काही वास्तुंचे अवशेष दिसून येतात. येथील बालेकिल्ल्यात एक लहान व एक मोठे अशी दोन मंदिरे असून मोठे मंदिर महादेवाचे व लहान मंदिर मल्हारीचे म्हणजे खंडोबाचे आहे.

शिवमंदिरात एक समाधी चौथरा दिसून येतो. खंडोबाच्या मंदिरात मल्हारीची म्हाळसासोबत अश्वारूढ मूर्ती असून या मुर्तीशेजारी काही लहान मुर्त्या ठेवलेल्या आहेत. याशिवाय बालेकिल्ल्यात मोठ्या प्रमाणात घरांचे व वाड्यांच्या जोत्याचे अवशेष दिसून येतात. बालेकिल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी उत्तर दिशेच्या तटबंदीत एक लहान दरवाजा असून एके ठिकाणी खोदीव हौद दिसून येतो. हा गड लहान असला तरी एक फेरी पूर्ण करण्यास एक तास लागतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *