रावरंभाच्या टीझरने ताणली उत्कंठा

‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट १२ मे पासून सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून हा चित्रपट म्हणजे एक ऐतिहासिक प्रेमकहाणी असणार आहे. यापूर्वीही अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला आहे. आधी या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख ७ एप्रिल होती. काही कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली.

”स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ आणि त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा,’ यांच्या रांगड्या प्रेमकहाणीचा हा उत्कंठावर्धक टीझर,” असे कॅप्शन देत दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी हा ‘टीझर’ शेअर केला आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत ओम भूतकर व मोनालिसा बागल दिसणार आहेत. लोकप्रिय अभिनेते अशोक समर्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

असेच काही चित्रपट यावर्षी मराठी पडद्यावर येणार आहेत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’, प्रवीण तरडे अभिनीत ‘बलोच’ आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटांची रसिकांनाही उत्सुकता लागली आहे. तानाजी मालुसरे यांच्या जीवनगाथा मांडणाऱ्या ‘सुभेदार’ सिनेमात अभिनेते अजय पूरकर सुभेदाराची दमदार व्यक्तिरेखा साकारत आहेत. ‘बलोच’ या सिनेमाचीही विशेष चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे. रावरंभाच्या टीझरच जर इतके उत्तम असेल तर चित्रपट काय असेल, अशी चर्चा चित्रपट रसिकांमध्ये असून त्यांची उत्कंठा ताणली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *