सूर्यफुलांनी सजले पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर सूर्यफुलांची आकर्षक आरास करण्यात आली असून ती मोठी चित्तवेधक ठरली आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये फुलांना येत असलेल्या बहराची यानिमित्ताने आठवण होते.

मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत करण्यात आलेली ही आरास भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. मंदिराच्या गाभाऱ्यात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली आहे.

सजावटीमध्ये लावण्यात आलेली सूर्यफुले ही तेलबिया येत नसलेल्या प्रजातीची आहेत. या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात. विशेषतः कळसावर चढविण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत आहेत. त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी गणेशभक्तांची येथे गर्दी होत आहे.