विविधरंगी ॲस्टर
बाजारात वर्षभर मागणी असलेले ॲस्टर हे एक फुलझाड आहे. विशेषतः पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची ॲस्टरची फुले आढळतात. ॲस्टरच्या फुलांचे विविध आकार, रंगछटा, टिकाऊपणा आणि आकर्षकता या गुणांमुळे ॲस्टरला सर्व थरातून मागणी असते. ॲस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठमोठ्या शहरांच्या भोवती केली जाते. ॲस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात. ॲस्टर फुलांची लागवड महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भातही होत आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास हे पीक वर्षभर केव्हाही घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ॲस्टर फुलपिकाची लोकप्रियता वाढली आहे.

थंड हवामानात ॲस्टरची वाढ चांगली होते. फुलांचा दर्जादेखील चांगला असतो. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. उन्हाळी हंगामात जास्त तापमान वाढल्यास फुलांचा दर्जा घसरतो. जास्तीत जास्त दर्जेदार फुले मिळण्यासाठी बियाण्याची पेरणी सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात करावी.
ॲस्टरची लागवड निरनिराळ्या जमिनीमध्ये करतात; परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास चांगली मानवते. हलक्या जमिनीत पिकाची वाढ खुंटते. ॲस्टरवर मावा, तुडतुडे, फुले व कळ्या पोखरणाऱ्या अळ्या यांचा प्रादुर्भाव जाणवतो.
ॲस्टरच्या विविध रंगांवरून ‘फुले गणेश व्हाईट’, ‘फुले गणेश पिंक’, ‘फुले गणेश पर्पल’ व ‘फुले गणेश व्हायोलेट’ या सुधारित जाती महात्मा फुले विद्यापीठाने विकसित केल्या आहेत. तसेच ‘अर्का कामिनी’, ‘अर्का पौर्णिमा’, ‘अर्का शशांक’ व ‘अर्का व्हायोलेट कुशन’ या जाती भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था, बंगळुरु यांनी विकसित केलेल्या आहेत. याशिवाय ‘ड्वार्फ क्वीन’, ‘अमेरिकन ब्युटी’, ‘स्टार डस्ट’, ‘सुपर प्रिन्सेस’ या परदेशी जातीही लागवडीसाठी प्रचलित आहेत.
बाजारातील मागणी लक्षात घेऊन योग्य जातीची निवड करावी.

ॲस्टर पिकाची मुळे जमिनीत खूप खोल न जाता जमिनीच्या वरच्या थरात राहतात. त्यामुळे मुळाजवळील माती ओली राहील अशा बेताने पाणी द्यावे. साधारणत: पिकाच्या गरजेनुसार ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. ॲस्टर फुलांचा बहार सुरू झाल्यानंतर मात्र पाण्याचा ताण पडू देऊ नये; अन्यथा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
लागवडीपासून साधारणत: अडीच ते तीन महिन्यात फुले काढणीस तयार होतात. ॲस्टरच्या पूर्ण उमललेल्याी फुलांची काढणी करतात. ॲस्टरचे हेक्टरी एक लाख जुड्यांचे उत्पादन मिळते; किंवा १०-१२ टन सुट्या फुलांचे उत्पादन मिळते.