
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात महड येथे अष्टविनायकांपैकी वरदविनायक हे श्री गणेशाचे सुंदर मंदिर आहे. महडचा वरदविनायक अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून ओळखला जातो. या मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून हेमाडपंथी आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला ‘मठ’ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाच्या मंदिरास सोनेरी कळस आहे. या कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिराच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात सापडली. कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी हे मंदिर बांधून महड गावही वसवले.
इथे एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आत अशा दोन मुर्त्या दिसतात. एक मूर्ती शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे. दुसरी मूर्ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात. गणपतीच्या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या मंदिरात एक नंदादीप अखंड तेवत आहे. हा नंदादीप अनेक वर्षांपासून अखंड तेवत असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे सभागृह ८० फूट लांब आणि ८० फूट रुंद असून शिखराची उंची २५ फूट आहे.

या क्षेत्रासंदर्भात एक कथा सांगितली जाते. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या भक्ताने शोध घेतला असता खरोखरच त्याला तिथे मूर्ती सापडली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. इथे भाविक दुपारी १२ वाजेपर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी १२ ते २ या वेळात प्रसाद दिला जातो. ‘गणेश चतुर्थी’, संकष्टीला येथे गर्दी असते. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी.अंतरावर आहे.