केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती
केंद्रीय राखीव पोलीस दलात अर्थात ‘सीआरएफ’ मध्ये देशातील सर्वात मोठी भरती होत आहे. सीआरपीएफमध्ये ‘कॉन्स्टेबल’ची दीड लाख पदे भरण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही पदे थेट भरतीद्वारे भरली जातील. केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून 1,29,929 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यात 1,25,262 पुरुष उमेदवारांची तसेच 4667 महिला उमदेवारांची भरती केली जाणार आहे. या जागा महिलांसाठीच राखीव आहेत. त्यामुळे सीआरपीएफमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी सीआरपीएफच्या crpf.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करणे अपेक्षित आहे.
कॉन्स्टेबल पदासाठी दर महिन्याला रु. 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे. केवळ भारतीय नागरिकांनाच उमेदवारीसाठी अर्ज करता येणार आहे. वय वर्षे 18 ते 23 अशी वयोमर्यादा आहे. याच वयातील उमेदवार अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील तरुणांच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्याकरिता कोणत्याही बोर्डाची दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा त्या समकक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी. तरुणांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी शारीरिक पात्रता चाचणी व लेखी परीक्षाही द्यावी लागणार आहे. माजी अग्नीवीर जर नोकरीसाठी अर्ज करीत असेल तर त्यालाही शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रातील रिक्त पदे भरणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ही भरतीची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरु ठेवावा.