सुतारकाम
सुतारकाम हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. आजही बरेच लोक परंपरागत व्यवसाय म्हणून सुतारकाम करतात. प्राचीन काळी लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी व इंधन म्हणून केला जात होता. त्यानंतर जलप्रवासासाठी लागणाऱ्या नौका, शेतीची अवजारे, वाहने, क्रीडासाहित्य, विविध कारखान्यांसाठी कच्चा माल, प्लायवुड, कागद वगैरे गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू लागला.

सुतारकाम म्हणजे लाकडाचा वापर करून मानवोपयोगी वेगवेगळ्या वस्तु तयार करण्याची कला होय. उत्तम कारागीर असलेला सुतार अतिशय सुंदर, आकर्षक आणि कलाकुसरीच्या लाकडी वस्तु बनवितो. सुतार लाकडाचा वापर करून नवनवीन कलाकृती बनवतात. या वस्तु बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड वापरले जाते.
सुतारकामात केवळ घरकामासाठीच आवश्यक वस्तु बनवतात असे नाही, तर नाविन्य, कल्पना वापरून इतरही आकर्षक कलाकृती बनविल्या जातात. शेतीसाठी लागणारी अवजारे लाकडापासून बनविली जातात. सुतार या व्यवसायातून जवळपास 10,000 ते 20,000 रुपये देखील कमवू शकतो. उत्तम कला असेल तर तो व्यक्ती स्वतःचा मोठा उद्योग देखील चालू करू शकतो.
सुतारकाम ही एक कला आहे. ती जर अंगी असेल तर सरकारच्या संबंधित विभागामध्ये सरकारी नोकरीदेखील मिळू शकते. फर्निचरच्या कारखान्यात देखील व्यक्ती काम करू शकते. एवढेच नाही, तर हा व्यवसाय केवळ पुरुषच करू शकतात असे नाही. महिला देखील सुतारकाम करू शकतात. आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण जगात सुतार कारागिरांची कमतरता जाणवत आहे.

सुतारकाम व्यवसायात मोठ्या इमारतीच्या बांधकामात लागणारे आणि कंपनीच्या कामासाठी साधने तयार करणे याचा समावेश होतो. रेल्वेगाड्या, आगबोटी आणि विमान यामध्ये लागणारी लाकडी साधने, बैलगाड्या, हातगाड्या तसेच घोडागाड्या, टांगे, मेणे व पालख्या यांसारखी वाहने, लाकडी भागावरील नक्षीकाम-कलाकुसर, कपाटे, बेंच, टेबल, खुर्ची अशा प्रकारचे साधे आणि मानवोपयोगी तसेच शोभिवंत आणि ऊंची फर्निचर तयार करणे, पिंजरे,दरवाजे, खिडक्या, कमानी, अशा प्रकारचे साहित्य बनविणे, शेतकामासाठी लागणारे औत, नांगर, अशी लाकडी अवजारे बनविणे, जुन्या पद्धतीच्या कौलारू घराला लागणारे खांब, चौकटी, कैच्या आणि तुळ्या असे साहित्य तयार करून त्यांची जोडणी करणे, आदी क्मांचा सुतारकामात समावेश होतो.
सुतारकाम व्यवसायासाठी करवत, डबरी करवत, रंधा, पटाशी, अंबर, हॅमर, राऊंड फाइल, आदी साधनांची आवश्यकता असते. सुतारकाम हा व्यवसाय आता विरळ झाला आहे. लाकडी आकर्षक वस्तूंची गरज मात्र समाजाला आहे. सुतारकाम करणारा कारागीर मिळणे आता दुर्लभ झाले आहे. ज्याठिकाणी हा व्यवसाय व्यवस्थित सुरु आहे ते कारागीर प्रामाणिकपणे मन लावून काम करीत असल्याने या व्यवसायावर आपले जीवन चालत असल्याचे सांगतात.