
विनोदसम्राट भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्या ‘करुन गेलो गाव’ या नाटकाचा पहिला प्रयोग आज ७ एप्रिलला मुंबईत होत आहे. या नाटकामध्ये ओंकार भोजने हा भाऊ कदमसह काम करीत असून त्यांचे हे पहिले व्यावसायिक नाटक आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला होता. हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते,परंतु आता नव्या भूमिकेत तो रसिकांच्या भेटीस येत आहे.
‘करून गेलो गाव’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारायला मिळणे ही आपल्यासाठी सुवर्णसंधी असल्याचे भोजने सांगतो. भाऊ कदम आणि ओंकार यांची जोडी कसा हशा पिकवते, रसिकांचे पोट दुखेपर्यंत कसे मनोरंजन करते, हे आजपासून दिसणार आहे.
“आपल्या कामाचा प्रत्येक कलाकाराला अभिमान वाटतो. मी जे काम करतो त्यामधून मला समाधान व आनंद मिळतो. मी कोकणातील आहे. कोकणचे प्रतिनिधीत्व करणारे हे नाटक करताना मी भारी खुश आहे,” असे ओंकार भोजने सांगतो.

एखाद्या कोकणी कलाकाराला कोकणी नाटक करायला मिळणे यासारखा आनंद नाही. माझे हे पहिले व्यावसायिक नाटक असून भाऊ कदम यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळत आहे. सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. नाटकांचा सराव नाही किंवा कोणता अनुभवही नाही. आता नाटक आपणास कितपत जमेल हे मी स्वतःच पाहणार असून त्यासाठी खूप उत्सुक असल्याचे ओंकार सांगतो. आता या नाटकात ही विनोदी जोडगोळी धमाल करणार हे निश्चित आहे. पण ते नेमके काय करतात, हे प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन पहावे लागेल.