
‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’ ने ‘कालजयी’ या सांगितीक कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा सोहळा होत आहे.
भारतातील विविध शहरांमध्ये पुढे वर्षभर सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिनांक ८ आणि ९ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत टाटा थिएटर, एनसीपीए येथे होणार आहे. संगीत, नृत्य, नाटक आणि साहित्य अशा विविध कला क्षेत्रांतील नामवंत कलाकारांचे कलाविष्कार आणि सादरीकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या दोन दिवस चालणाऱ्या रंगतदार कार्यक्रमात सुरेश तळवलकर, मंदार पुराणिक, सत्यजीत तळवलकर, ओजस अडिया, प्रशांत पांडव तबल्यावर साथसंगत करणार आहेत. सुयोग कुंडलकर आणि निरंजन लेले हार्मोनियमवर साथसंगत करणार आहेत.

पंडित कुमार गंधर्व यांचे खरे नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली आहे. कुमारजींचा संगीत प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. अचानक एके दिवशी त्यांनी थेट गायनाला सुरुवात केली. त्यांचे संगीत खऱ्या अर्थाने मुंबईत बहरल्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीचा पहिला कार्यक्रम मुंबईत होणार आहे.
यावेळी कुमार गंधर्वांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन टाटा थिएटरच्या वरच्या बाजूस पाहता येईल. ‘कुमार गंधर्व प्रतिष्ठान’ने ‘एनसीपीए’ आणि ‘पंचम निषाद’ यांच्या विशेष सहकार्याने याचे आयोजन केले असून हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमींसाठी खुला आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपण ७०४५५९७५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा