पादत्राणे विक्री व्यवसाय
कोणताही व्यवसाय, केवळ एखाद्या क्षेत्रात आवड आहे म्हणून सुरु करून उपयोग होत नाही, तर तो यशस्वीरित्या चालू ठेवण्यासाठी सखोल ज्ञान आणि नियोजन आवश्यक असते. अलीकडे पादत्राणे विक्री व्यवसायाला फार महत्त्व आले आहे. आता चप्पल, शूज, सँडलमध्येही विविध प्रकार येतात. केवळ गरज म्हणून चप्पल न वापरता ही एक फॅशन झाली आहे.

पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास प्रथम टप्पा म्हणजे आपण स्त्री, पुरुष, बालके यांना आवश्यक असणारे सर्व प्रकार ठेवणार आहात की फक्त विशिष्ट वर्गासाठीच चप्पल विक्रीस ठेवणार आहात, याचा आधी विचार करावा. पुरुषांची किंवा महिलांची पादत्राणे विविध प्रकारची व विविध प्रकारच्या कच्च्या मालापासून बनवलेली असतात. आपण जिथे विक्री व्यवसाय सुरु करू इच्छित आहात तेथील ग्राहकांना समोर ठेऊन त्यांच्या अभिरुची, जीवनशैली अभ्यासावी. चप्पल, शूज, सँडल या सर्वांचे विविध प्रकार आहेत. ते समजून घ्यायला हवेत. एकदा ठराविक उत्पादन निवडल्यानंतर, त्याचे उत्पादन कुठे केले जाते, घाऊक विक्री कुठे होते, याची माहिती करून घ्यायला हवी. यापैकी आपणास सहजपणे ही उत्पादने कुठून मिळू शकतील याचाही आढावा घ्यावा.
आपल्या शूज व्यवसायासाठी उत्पादने निवडल्यानंतर पद्धतशीर नियोजन करणे आवश्यक आहे. आपल्या व्यवसायाचे नेमके स्वरूप कसे असेल, व्यवसाय कोणत्या मार्गाने चालविला जाईल, आपण आपली विक्री जोडव्यवसाय म्हणून करणार आहोत का,आपल्या वस्तूंची आपण ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही प्रकारे विक्री करणार आहोत का, व्यवसायासाठी जागा बघितलेली असल्यास तिथे कशा प्रकारची रचना असेल, या सगळ्याचा व्यवस्थित तपशील आपल्याकडे असला पाहिजे. व्यवसाय स्थापित करण्यासाठी येणारा खर्च आपण कसा उभा करणार आहोत, या व्यवसायाचे आपल्या बाजारपेठेत नेमके स्थान कसे आहे, अशा प्रकारचा व्यवसाय करणारे इतर व्यावसायिक आहेत का, त्यांच्यापेक्षा मी वेगळे काय करणार, व्यवसायासाठी निधी कोणकोणत्या मार्गाने उभा करु शकतो, व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या, व्यवसायासाठी आवश्यक उपकरणे आणि साहित्य, याची माहिती असायला हवी.

पादत्राणे बनवायला शिकविणारी २ महाविद्यालये आहेत. कोल्हापूरमध्ये कोल्हापूरी चप्पल उद्योगसमूह आणि शिवाजी विद्यापीठ, तर चेन्नई येथील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट याठिकाणी चर्मोद्योगासंदर्भात प्रशिक्षण घेता येते. अशा ठिकाणाहून आधी जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा.
हा व्यवसाय सुरू करताना व्यवसायाची नोंदणी करणे ही एक आवश्यक पायरी आहे. आपण आपला व्यवसाय एकल मालकी, भागीदारी, मर्यादित दायित्व भागीदारी किंवा एक व्यक्ती कंपनी यापैकी कुठल्याही एका प्रकारे करू शकता.
पादत्राणे विक्री व्यवसायात ‘शॉप ॲक्ट’ परवाना आवश्यक असतो. देशभरातील समान कर संरचनेचे पालन करण्यासाठी आणि व्यवसाय सुरळीत पार पाडण्यासाठी ‘जीएसटी’ नोंदणीची आवश्यकता असते. पूर्ण तयारीनिशी आपण आपला पादत्राणे विक्रीचा व्यवसाय आपल्या बाजारपेठेत सुरु करू शकता. समाजमाध्यमांद्वारे आपल्या वस्तूंची उत्तम जाहिरात करून विक्री करू शकता.