औषध निर्मिती उद्योग
जागतिक औषध निर्मिती उद्योगात भारतीय औषध उद्योगाची फार मोठी भूमिका आहे. कोरोना साथीत भारताने बनवलेली लस सर्वांसाठी परिणामकारक ठरली, ही लस जगासाठी नवसंजीवनी देणारी ठरली. अनेक देशांमध्ये या लसीचा पुरवठा करण्यात आला, हे भारतातील उद्योगाचे फार मोठे फलित आहे.

भारत हा जागतिक स्तरावरील जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा उत्पादक आहे. जेनेरिक औषधे म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता, उपयोग आणि कामगिरी ही ‘ब्रॅंडेड’ औषधासारखीच असते; परंतु त्याला कोणतेही ‘ब्रॅंड’ नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि वेष्टन वेगळे असते. ही औषधे त्या-त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात.
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे आजार आजकाल सध्याची जीवनशैली व धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे समाजातील सर्वच वर्गात दिसतात. गरीबांनादेखील या आजारांशी सामना करताना औषधे सहज आणि माफक दरात उपलब्ध व्हावीत याकरिता जेनेरिक औषधांचा पर्याय उपल्ब्ध आहे.
भारतीय औषध उद्योग सध्या औषध उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेनेरिक औषधे, लसनिर्मिती, करार संशोधन आणि उत्पादन हे भारतीय औषध उद्योगातील काही प्रमुख विभाग आहेत. ‘यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन’ नुसार भारतामध्ये सर्वात जास्त औषधे उत्पादन सुविधा आहेत.
भारतीय औषधनिर्मिती क्षेत्र विविध लसींच्या जागतिक मागणीच्या 50%, यूएसमधील जेनेरिक मागणीच्या 40% आणि यूकेमधील सर्व औषधांच्या 25% पेक्षा जास्त पुरवठा करते. देशांतर्गत औषधनिर्मिती उद्योगामध्ये 3,000 औषधनिर्मिती कंपन्या आणि 10,500 उत्पादन विभागाचे नेटवर्क समाविष्ट आहे. जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात भारताचे महत्त्वाचे स्थान आहे. भारतात या क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि अभियंते यांचाही मोठा समूह असून या उद्योगाला अधिक उंचीवर नेण्याची त्यांच्यात क्षमता आहे. सध्या एड्सचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या 80% पेक्षा जास्त औषधांचा पुरवठा भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांकडून केला जातो. कमी किमतीच्या आणि उच्च दर्जाच्या औषधांमुळे भारताला ‘जगाचे औषध दुकान’ म्हणून ओळखले जाते.

भारतीय आर्थिक सर्वेक्षण 2021 नुसार, पुढील दशकात देशांतर्गत बाजारपेठ 3 पट वाढण्याची अपेक्षा आहे. भारताच्या जैवतंत्रज्ञान उद्योगात जैवऔषधनिर्मिती, जैवसेवा, जैवकृषी यांचा समावेश होतो.
जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात भारत हा एक महत्त्वाचा आणि उदयोन्मुख खेळाडू आहे. भारत जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार आहे. भारतीय औषधनिर्मिती क्षेत्र जगभरात 42 अब्ज डॉलरचे आहे.
भारत हा जगातील 12 व्या क्रमांकाचा वैद्यकीय वस्तुंचा निर्यातदार आहे. भारतीय औषधे जगातील 200 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. ज्यामध्ये अमेरिका ही प्रमुख बाजारपेठ आहे. जागतिक निर्यातीमध्ये जेनेरिक औषधांचा वाटा 20% आहे, ज्यामुळे देश जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा सर्वात मोठा प्रदाता बनला आहे.
महाराष्ट्रात पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे औषधनिर्मिती करणारे उद्योग विसावलेले आहेत.