ससेपालन व्यवसाय
ससेपालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. जगभरात तो मोठ्या प्रमाणात केला जातो. फ्रान्स, इटली, स्पेन, जर्मनी, रशिया, चीन,हंगेरी, ब्रिटन, अमेरिकासारख्या देशात मांस, फर,लोकर उत्पादनासाठी सशांचे संगोपन आधुनिक प्रगत पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र आपल्या भारतात या व्यवसायाकडे तेवढेसे लक्ष दिले जात नाही.

ससा मुळचा युरोपातील प्राणी आहे. आता त्याचे जगभर पालन केले जाते. न्यूझीलंड व्हाईट, न्यूझीलंड ब्लेक, ग्रे व्हाईट, रशियन चिंचीला इ. जातीचे ससे सध्या पाळण्यासाठी उपलब्ध आहेत.
ससेपालन हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. भारतात प्रथिनयुक्त मांसासाठी ससेपालन केले जाते. सशांच्या आहारासाठी वेगळे खाद्य आणावे लागत नाही. सहज उपलब्ध असलेला पाला, टाकून दिलेला भाजीपाला, घरात उपलब्ध असलेले धान्य ससे आवडीने खातात. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. त्याला ‘लासुनात’, ‘बरसीम’ असा चारा दिला जातो. पालक, कोबी, इ. पालेभाज्या, गव्हाचा कोंडा, स्वयंपाकघरातील उरलेले अन्न व भाजीपाल्याचा टाकाऊ भाग दिला जातो. आहारात प्रथिने मिळण्यासाठी सोयाबीन किंवा भूईमुगाची ढेप दिली जाते. दिवसभरात स्वच्छ व पुरेसे पाणी देणे गरजेचे असते. नवनवीन संकरीत प्रजातींच्या पिल्लांची वाढ झपाट्याने होते.
व्हाईट जायंट, ग्रे जायंट, फ्लेमिश जायंट, न्यूझीलंड व्हाईट, न्यूझीलंड रेड, कॅलिफोर्नियन, सोव्हियत चिंचिला, या काही सशांच्या प्रजाती आहेत. वाढत्या लोकसंख्येला मांसाची आवश्यकता जास्त आहे. मांसाची मागणी वाढली असून देशांतर्गत मांस उत्पादन तोकडे पडत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच या व्यवसायाची जोड धरणे आवश्यक आहे.

कमी पडत असलेल्या मांसाची गरज भागविण्याकरिता कमीत कमी वेळेत जास्त मांस उत्पादन करणारे प्राणी पालन करणे आवश्यक आहे. सश्याच्या मांसाला वैशिष्ट्यपूर्ण चव असून हे मांस रुचकर असल्यामुळे मांसाहारी वर्गात याला भरपूर मागणी आहे.
ससेपालनासाठी लोखंडी पिंजरे गरजेचे असतात. सश्यांना पिंजऱ्यात योग्य पद्धतीने खाद्य देता येते. त्यांची वाढ होते की नाही हे बारकाईने लक्षात येते. त्यांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. सश्यांच्या शरीरात तापमान कमी करण्याची योजना नसते. त्यामुळे उष्ण वातावरणात ससेघरात पंख्याची व्यवस्था करावी लागते.
महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना ससेपालन व्यवसायाचा विचार करण्यास हरकत नाही. त्यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन पूर्व प्रशिक्षण घ्यावे. लहानापासून सुरुवात करून पहावी. चांगले जमत असल्यास व्यवसाय वाढवावा.