आरोग्यदायी आले
आले हे आरोग्यदायी मसाल्यांपैकी एक आहे. आले पदार्थाची चव वाढवते, शिवाय हे आरोग्यदायी आहे. आल्याचा वापर मसाला, औषध, सौंदर्यवर्धक म्हणून केला जातो. हिवाळ्यात खोकला, सर्दी इत्यादींवरही याचा वापर होतो. आल्याचे तेल आणि पावडर औषधांमध्येही वापरले जाते.

आल्याची शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार असून त्याच्या लागवडीत प्रचंड उत्पादन क्षमता आहे. अधिक फायदेशीर शेती करायची असेल, तर आले शेती हा एक चांगला पर्याय आहे. भारत देश हा आल्याचा प्रमुख उत्पादक आहे. कर्नाटक, ओरिसा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि गुजरात ही भारतातील प्रमुख आले उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रात आल्याची शेती छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. आले ही उष्ण आणि दमट हवामानात वाढणारी वनस्पती आहे. आल्याच्या झाडाला वाढीदरम्यान जास्त पाणी लागते, तर काढणीवेळी कोरडे हवामान आवश्यक असते.
आले निर्यातीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो. दक्षिण-पश्चिम आणि ईशान्य भारतातील काही भाग आले उत्पादनासाठी सर्वात योग्य आहेत. येथील उष्ण आणि दमट हवामान, सरासरी पर्जन्यमान व माती आले लागवडीसाठी योग्य आहे.
वालुकामय, चिकणमाती, लाल किंवा लॅटराइट माती आले पिकासाठी योग्य आहे. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीवर आल्याची चांगली वाढ होते. भारतात वेगवेगळ्या हंगामात आल्याची लागवड केली जाते. दक्षिण भारतात मार्च-एप्रिलमध्ये पेरणी केली जाते. आले पीक परिपक्व होण्यासाठी सुमारे 8 ते 9 महिने लागतात. शेत तयार करण्यासाठी दोनदा तिरपी नांगरणी करून जमीन सपाट करावी. सिंचनाच्या सोयीनुसार आणि पेरणीच्या पद्धतीनुसार तयार केलेले शेत लहान वाफ्यांमध्ये विभागून घ्यावे. खतांचा योग्य वापर करावा.

आल्याच्या बिया जमिनीत ३ ते ४ इंच खोलीवर लावाव्यात. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात आल्याच्या अनेक सुधारित जाती आहेत. ज्या प्रदेशात ते पिकवले जाते, त्या प्रदेशावरून त्यांना नावेदेखील देण्यात आली आहेत. आल्याच्या प्रमुख जाती ‘सुरुची’, ‘आयआयएसआर महिंद्रा’, ‘आयआयएसआर वरदा’, ‘रिओ डी जानेरो’, ‘वायनाड लोकल’, ‘तुफांगिया’, ‘टेली रोल-रिओ डी जनेरियो’, ‘मारन’, ‘वायनाड मानन’, ‘वुलुनतु’, ‘अरनाडू’ आहेत.
आले कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक आहे. शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास चांगला नफा मिळतो. आले पीक हेक्टरी सरासरी 150 ते 200 क्विंटल उत्पादन देते. एका एकरात सुमारे 1 लाख 20 हजार रुपये खर्च येतो.