
उत्तर प्रदेशातील एका कुटुंबातील सात सदस्यांच्या हत्येवर आधारित ‘लव्ह किल्स: शबाना आणि सलीम-अमरोहा मर्डर केस’ ही वेबमालिका आहे. डिस्कव्हरी प्लसवर तुम्हांला ही मालिका पाहता येईल. काही वर्षांपूर्वी घडलेली सत्य घटना ही मालिका उलगडते.
सन 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील ‘अमरोहा’ जिल्ह्यातील ‘बावनखेडी’ गावात सामूहिक हत्या करण्यात आली होती, ज्याने केवळ ‘अमरोहा’ आणि उत्तर प्रदेशच नाही, तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. प्रेम माणसाला ‘चांगला माणूस’ बनवते, असे म्हटले जाते. याभोवती ही कथा फिरते. प्रेमातील वेडेपणा आणि एकमेकांना साथ देण्याची ओढ माणसात कसा बदल घडवते हे यात दाखविले आहे.
पोलीस अधिकारी, वकील, नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या आधारे या माहितीपट मालिकेची संपूर्ण कथा मांडण्यात आली आहे. ही कथा मनाला भिडणारी आहे.

या माहितीपट मालिकेत प्रत्येकी 25 मिनिटांच्या 3 भागांचा समावेश आहे. हे तिन्ही भाग शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. या थक्क करणाऱ्या कथेचे पदर जसजसे उलगडू लागतात, तसतसे तिच्या सभोवतालचे रहस्यही उलगडत जाते.
या मालिकेत माजी महानिरीक्षक बद्री प्रसाद, तपास अधिकारी आरपी गुप्ता, मनोज राणा आणि आरोपी शबानाचे वकील सैफुल इस्लाम सिद्दीकी यांच्यासह गावातील अनेकांनी या घटनेशी संबंधित माहिती दिली आहे. मालिकेत मूळ चित्रीकरणाचा बहुतांश वापर करण्यात आला आहे. संशोधन आणि लेखन चमूने प्रभावी माहितीपट मालिका बनविण्यात मोलाचे योगदान दिले आहे.