सायकल विक्री दुरुस्ती व्यवसाय
सायकलचे महत्त्व आजही अबाधित आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सायकल गरजेची असते. अलीकडे बाजारात भारतीय आणि परदेशी बनावटीच्या वेगवेगळ्या सायकल दिसतात. सायकल विक्री आणि सायकल दुरुस्ती हा व्यवसाय आजही गरजेचा आहे.

पर्यावरणविषयक जनजागृती होत असल्याने आधुनिक सायकलींचा वापर वेगाने वाढत आहे. त्यामुळे सायकल दुरुस्ती शिकून सायकल विक्रीसह दुरुस्तीचा व्यवसाय करता येऊ शकतो. हा व्यवसाय स्वतःच्या मालकीच्या जागेत किंवा भाड्याच्या जागेत केला जातो. केवळ दुरुस्ती करायची असल्यास फारशा मोठ्या जागेची गरज नसते. विक्रीसाठी मात्र जागेची गरज असते. शक्यतो विक्रीसह दुरुस्तीचा व्यवसाय असल्यास तो फायदेशीर ठरतो.
सायकल दुरुस्तीसंदर्भात बरीच माहिती महाजालावर मिळते. युटूबवर व्हिडीओच्या स्वरूपात माहिती उपलब्ध असते. हाताला लागलेले वंगण कसे साफ करायचे, जुनी सायकल नवीन स्वरुपात अशी आणायची ही सगळी माहिती सहजपणे आपण मिळवू शकतो. सायकल दुरुस्तीसंदर्भात बोलताना साधारणपणे सायकलच्या तक्रारी म्हणजे टायर पंक्चर होणे, ब्रेक न लागणे, गीअर व्यवस्थित शिफ्ट न होणे अशा असतात. किमान माहिती असणारे प्रशिक्षण घेऊन अनुभवाने या समस्या सहजपणे दूर करता येऊ शकतात.

सायकल दुरुस्ती व्यवसायासाठी ‘पंक्चर किट’ असायला हवे. यामध्ये ग्लू, सॅन्डपेपर, टायर लीवर आणि हवा भरण्याचा पंप यांचा समावेश असतो. याशिवाय सायकल पंप, ॲलन की असायला हवी. आधुनिक गीअर सायकलींसाठी वापरल्या जाणाऱ्या या उपकरणांमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या कीज् असतात. सायकल जोडणी, ब्रेक आणि गीअरच्या सर्व कामांसाठी ते वापरता येते.
वायर कटर, चेन टूल असायला हवे. सायकलचा एखादा भाग चिकटवण्यासाठी तात्पुरता वापर करता येऊ शकणारी इलेक्ट्रिकल टेप आवश्यक असते. सायकलला जोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या स्क्रूमध्ये वंगणाचा वापर होतो. स्क्रू ड्रायव्हर, टायर लीवर, लहान हातोडी, कात्री, पाना, गीअर ब्रश, स्पोक पाना, बाइक दुरुस्ती स्टँड यांचीही आवश्यकता असते. अशी सर्व उपकरणे या व्यावसायिकांकडे असतात.