
सर्वप्रथम 1 वाटी मेथी दाणे घ्या. ते 3 तास पाण्यात भिजवत ठेवा. 3 तासानंतर 10 ते 15 मिनिटे वाळवून एका सुती कापडात त्याची पुरचुंडी बांधून एका बंद डब्यात ठेवा. 8 तासांनी मेथीदाण्याला कोंब आलेले दिसतील, तेव्हा ते लोणच्यासाठी तयार आहेत असे समजावे.
साहित्य : 1 वाटी मेथीदाणे (मोड आलेले), 1 वाटी गूळ, 2 लिंबांचा रस, अर्धी वाटी मोहरीची डाळ, अर्धा चमचा हिंग, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, तिखट आवडीनुसार, 1 ते दीड वाटी तेल.

कृती : प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल थोडे थंड झाले की, त्यात मोहरीची डाळ, तिखट, हळद, हिंग टाकून आणखी थंड होऊ द्या. तेल थंड होईपर्यंत एका पसरट भांड्यात मोड आलेले मेथीदाणे घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि गूळ घालून छान हलक्या हाताने मिसळा. आता या मेथीदाण्याच्या मिश्रणावर थंड झालेला लोणच्याचा मसाला (तेल) पसरून ओता. त्यावरून लिंबाचा रस घालून परत छान मिसळून घ्या. मेथीदाण्याचे लोणचे तयार !