फळ निर्यात केंद्र
फळविक्री व्यवसाय हा एक रोजगार मिळवून देणारा व्यवसाय आहे. फळे नाशवंत असल्याने हा व्यवसाय थोडासा जोखमीचा आहे. सुरुवातीला जिथे व्यवसाय सुरु केला जाणार आहे, तेथील ग्राहक, बाजारपेठ याचा अभ्यास करून कमी प्रमाणात माल विक्रीस ठेवावा. आपल्या फळांची निर्यात करावी. यासाठी आपण फळे निर्यातीचे केंद्रही सुरु करू शकतात.

निर्यात केंद्र सुरु करताना आपण कोणकोणत्या फळांची निर्यात करणार आहात, हे सर्वप्रथम निश्चित करावे. आपण निवडलेले फळ आपणांस वाजवी किंमतीत मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारे असले पाहिजे. जे फळ बराच काळ ताजे राहू शकते, असे फळ शक्यतो निवडावे. वेगवेगळ्या देशांमध्ये कोणत्या फळांना जास्त मागणी आहे, याचा शोध घ्यायला हवा. आपले फळ दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असणे अतिशय महत्त्वाचे आहे; अन्यथा इतर देशांच्या अन्नधान्य प्राधिकरणाकडून ते नाकारले जाऊ शकते.
निर्यात करण्यासाठी आपला व्यवसाय अधिकृत असायला हवा. याकरिता आपल्या व्यवसाय केंद्र सरकारकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कोणतीही निर्यात फर्म स्थापन करण्यासाठी बंदर किंवा विमानतळाजवळ जागा पहावी. यामुळे आपल्या वाहतूक खर्चात लक्षणीय घट होईल. अन्यथा, गोदामातून बंदर किंवा विमानतळापर्यंत मालवाहतूक करणे महाग आणि अवघड ठरू शकते.
स्वतःचा निर्यातीचा व्यवसाय स्थापन करताना काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतःच्या व्यवसायाला चांगले नाव आणि लोगो द्या. ज्या नावामुळे आपला परदेशातील ग्राहक आकर्षित होईल.
आपल्या फर्मचा जीएसटी क्रमांक असायला हवा. व्हॅट किंवा इतर करांच्या संबंधित कामे आधी पूर्ण करून घ्यायला हवीत. आयातदार-निर्यातक क्रमांकासाठी (आयईसी) अर्ज करा. आयात – निर्यात व्यवसायासाठी हे अनिवार्य आहे. यासाठी ‘डीजीएफटी’ या संकेतस्थळाला भेट द्यावी. या क्रमांकासाठी ऑनलाइन अर्ज करावा.

नोंदणी-सह-सदस्यत्व प्रमाणपत्र हे आरसीएमसी फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन किंवा इतर एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल बोर्डाद्वारे जारी केले जाते. ते मिळवावे लागेल. या संस्था निर्यात व्यवसायाच्या वाढीसाठी कार्य करतात. त्यांना भारत सरकारचे अधिकार आहेत. हे प्रमाणपत्र पाच वर्षांसाठी असून आपण नोंदणीकृत असल्याचा पुरावा असते.
किंमतीबाबत निर्णय घेताना, सर्व प्रकारचे खर्च, शुल्क विचारात घेतले पाहिजेत. वाजवी किंमत ठेवण्याची आवश्यकता असेल; जेणेकरून आपण विक्री करत असलेल्या देशातील स्थानिक ग्राहकांना ती अजून आकर्षक वाटेल. महाजालाद्वारे आपण आपले उत्पादन जागतिक पातळीवर नेऊ शकता. त्याचा लाभ करून घ्या. कोणत्याही देशाच्या स्थानिक बाजारपेठेत डीलरद्वारे आपण हे विकू शकता.
मालाच्या निर्यातीसाठी स्वस्त असा सागरी मार्गाचा पर्याय आपण निवडू शकता. हवाई वाहतूक ही जलद आहे, पण तेवढीच महाग असते. आपली फळे जलद पोहोचणे आवश्यक असल्याने आपण हवाई मार्गाचा उपयोग करू शकतात. यासाठी कार्गो वाहतूक करणार्या कंपनीच्या सर्व नियम आणि अटींशी सहमत असणे आवश्यक आहे. निर्यात व्यवसायात परदेशात विविध चलनांमध्ये व्यवहार करावे लागतात. त्यासाठी विश्वासार्ह बँकेत खाते उघडावे लागेल.
फळांच्या निर्यातीचा व्यवसाय सोपा किंवा पूर्णपणे फायदेशीर नसतो; परंतु जर त्याचे चांगले नियोजन केले, तर व्यवसाय सुरळीत चालू शकतो.