
महाराष्ट्रातील कोकण विभागात आंगणेवाडीच्या भराडी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी भरणारी ‘आंगणेवाडी जत्रा’ सर्वाधिक लोकप्रिय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात हे मंदिर आहे. या गावातील देवतेच्या दर्शनाविषयी अनेक आख्यायिका आहेत.
हे एक ‘जागृत देवस्थान’ आहे. येथे बोललेले नवस पूर्ण होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.आंगणेवाडी ही ‘कोकणातील पंढरपूर’ म्हणून ओळखली जाते. एका पौराणिक कथेनुसार, 400 वर्षांपूर्वी गावात देवी अवतरली होती. तेव्हापासून दरवर्षी या गावात दर्शनासाठी लोकांची गर्दी होत आहे.
मालवण तालुक्यात ‘मसुरे’ हे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचे नाव ‘भराडी देवी’ असे ठेवण्यात आले आहे. ‘भराड’ म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे माळरान आहे; म्हणूनच या देवीला ‘भराडी देवी’ असे नाव पडले.
मसुरे गावाच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ ‘आंगणे’ कुटुंबीय राहतात. ‘नवसाला पावणारी देवी’ अशी ख्याती असल्याने देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले आहे. गाऱ्हाणे आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी भराडी देवीचे दर्शन घेतात.

दरवर्षी सुमारे 5 ते 7 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी पारंपरिक नैवेद्य करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात.
धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात, त्याला ‘मांडावरचे नाटक’ असे म्हणतात. मिरजेहून आलेले गोंधळी देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो. अनेक राजकारणी मंडळी भराडी देवीच्या दर्शनाला येतात.
आंगणेवाडी जत्रेला भेट देणाऱ्यांचे समाधान सीमेपलीकडे असल्याने त्याची लोकप्रियता वाढतच जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे आकर्षित होतात. मालवण शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावर हे मंदिर आहे. आंगणेवाडीला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कणकवली आणि ओरोस ही जवळची रेल्वेस्थानके आहेत. मुंबई, पुणे किंवा गोव्याहून येत असाल, तर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मालवणमधील हॉटेलमध्ये मुक्काम करू शकता.