
‘मिर्झापूर’ ही एक लोकप्रिय वेबमालिका आहे. या मालिकेने प्रेक्षकांना पडद्यावर खिळवून ठेवले आहे. ही एक गुन्हेविषयक मालिका असली, तरीही तिच्या तिसऱ्या हंगामाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘मिर्झापूर’ या वेबमालिकेचा सन 2018 मध्ये पहिला हंगाम आला. या पहिल्या हंगामाची अशी जादू होती की, त्यातील पात्र आणि संवाद प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले.
सन 2020 मध्ये, मालिकेचा दुसरा भाग देखील प्रदर्शित झाला.त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. आता चाहत्यांना ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या हंगामाची प्रतीक्षा आहे.
‘मिर्झापूर’ वेबमालिकेमध्ये पंकज त्रिपाठीपासून अली फजलपर्यंत अनेक मोठे अभिनेते दिसले आहेत. ‘कलीन भैया’, मुन्ना त्रिपाठी, गुड्डू पंडित यांसारख्या पात्रांना चांगलीच पसंती मिळाली होती. याशिवाय दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी, विजय वर्मा या कलाकारांनी आपली छाप सोडली होती. ‘मिर्झापूर’चा पहिला आणि दुसरा भाग ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. तिसरा भागदेखील ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाईल.

मिर्झापूरच्या तिसऱ्या हंगामाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु आतापर्यंत त्या संदर्भातील कोणतीही अधिकृत तारीख समोर आलेली नाही. तथापि, माध्यमांच्या हवाल्यानुसार, हा हंगाम यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. सन 2018 मध्ये पहिल्या हंगामाचे आर्थिक नियोजन जवळपास 12 कोटी रुपये होते; पण त्याला ज्याप्रकारे प्रतिसाद मिळाला, त्यानंतर दुसऱ्या हंगामाचे नियोजन 5 पटीने वाढवून जवळपास 60 कोटी करण्यात आले होते. त्याचवेळी आता तिसऱ्या हंगामाचे नियोजन जवळपास 78 कोटी रुपये झाले असल्याच्या चर्चा आहेत.