व्यापक विस्तारलेला वाहतूक व्यवसाय
वाहतूक हा एक सेवा व्यवसाय आहे. प्रवाशांसह मालाची वाहतूक वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. या व्यवसायाने अलीकडे मोठे स्वरूप धारण केले आहे. यामध्ये गावागावांमधील वाहतूक, देशांतर्गत वाहतूक एवढेच नव्हे, तर विदेशातही प्रवासी आणि मालाची ने-आण करावी लागते. बरेच जणं अर्थार्जनासाठी वाहतूक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात.

वाहतूक व्यवसायात बाजारात बरीच तेजी दिसते. हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. बरेच लोक स्टार्टअप व्यवसाय कल्पना म्हणून याकडे पाहत आहेत. या व्यवसायात नवनवीन कल्पना आणून काम करणे शक्य आहे. ‘ओला’ आणि ‘उबर’ सारखी मोबाइल ॲप्सवर आधारित टॅक्सी सेवा वाढत आहे. हा वाहतुकीचा एक सोयीचा मार्ग आहे आणि लोकांनी त्याला पसंती दिली आहे.
आपण ‘ओला’ ड्राइव्हरचे भागीदार बनून व्यवसायाला प्रारंभ करू शकता. यासाठी आपल्याला आपल्या कारचा क्रमांक प्रादेशिक कार्यालयात नोंदणी करून काही मूलभूत कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी आपल्याकडे चांगले चालक कौशल्य असले पाहिजे. ‘कार शटल सेवा’ आपण सुरु करू शकता. ही सुविधा बहुधा कंपनी कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी टॅक्सी निश्चित करतात. आपण अशा एक किंवा अधिक कंपन्यांसह करार करू शकता.
आपण आपली स्वतःची एजन्सी देखील सुरू करू शकता. आपण आपली वाहने भाडेतत्त्वावर देऊ शकता. आपण स्वतः सहली आयोजित करू शकता. यामुळे तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते.ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ झाल्यामुळे ‘फ्लिपकार्ट’सारख्या कंपन्यांना कमी वेळात वारंवार कुरिअर सेवांची आवश्यकता असते. आपण आपला वाहतुकीचा व्यवसाय निर्धारित करू शकता.

ट्रक वाहतूक सेवा ही एक महत्त्वपूर्ण सेवा आहे. त्या संपूर्ण राज्यात अवजड सामान ते वाहून नेतात. हा धोकादायक व्यवसाय आहे; परंतु यात नफा जास्त आहे. या व्यवसायासाठी आपल्याकडे वैध परवाना असणे आवश्यक आहे. आपण चांगले चालक असायला हवे. या व्यवसायासाठी प्रवासी बस सेवा सुध्दा एक चांगला पर्याय आहे. आपण रुग्णवाहिकेचा व्यवसाय करू शकता. या वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक जास्त असते; परंतु योग्य नियोजन, मेहनतीने आपण उत्तम नफा मिळवू शकता. व्यवसाय सुरू करण्यासाठी दुचाकी भाड्याने देण्याची सेवा हा आणखी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रारंभिक गुंतवणूक कमी असून देखभालदेखील कमी आहे.
आजकाल बहुतेक सर्व प्रमुख शहरांमध्ये सायकल भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. आपण दररोज, साप्ताहिक किंवा मासिक तत्वावर सायकली भाड्याने देऊ शकता. त्यामधून चांगली कमाई करू शकता. पशुधन वाहतुकीसाठी तशा पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण वाहने असतात. ती आपण घेऊन व्यवसाय करू शकता. आपला नफा जास्तीत जास्त वाढविण्यासाठी आपणास पुरवठादारांशी घनिष्ठ संबंध ठेवणे आवश्यक आहे. वाहतूक व्यवसाय हा ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत विस्तारलेला व्यवसाय आहे.