इंटेरिअर डिझायनिंग व्यवसाय
‘इंटेरिअर डिझायनिंग’ हा अलीकडच्या काळातील विकसनशील व्यवसाय आहे. इमारतीमध्ये कार्यात्मक जागा निर्माण करणारा हा व्यवसाय आहे. घर अथवा कार्यालयाच्या आतील सजावट म्हणजे त्या जागेस विशिष्ट सौंदर्य प्राप्त करून देणारा हा व्यवसाय आहे. बांधलेली वास्तू आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी जी सजावट केली जाते, ते म्हणजे ‘ इंटेरिअर डिझायनिंग’!

व्यावसायिक किंवा निवासी जागेत इंटेरिअर डिझायनर्स सर्जनशीलतेने काम करतात. या सर्जनशीलतेमुळे कमी जागेत अधिक काम करता येते. त्या जागेच्या रहिवाशांना आनंद आणि प्रसन्नता लाभते. जीवनशैलीची गुणवत्ता वाढविणारा हा एक व्यवसाय आहे. ज्याठिकाणी सजावट करायची आहे, त्या प्रकल्पाचे भौतिक स्थान आणि सामाजिक संदर्भ लक्षात घेतले जातात. त्यावर विचारपूर्वक उपाय अंमलात आणून इंटेरिअर डिझायननर उत्तम प्रकारे मोकळ्या जागा तयार करू शकतात. कमी जागेतही उत्तम संरचना करून मोकळी जागा निर्माण करणे, पाहताक्षणी वास्तू एखाद्याला आवडेल अशा प्रकारची सुंदर सजावट करतात. तिथे राहणाऱ्या लोकांना त्यामुळे समाधानाची अनुभूती मिळते. उदाहरणार्थ, आरोग्यसेवा संस्थांमध्ये रचना करीत असताना रुग्णांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर कसा परिणाम होईल याचा विचार केला जातो. याबद्दल बरेच संशोधनही झाले आहे. इंटेरिअर डिझायनिंग व्यवसायासाठी परवाना आवश्यक नसतो. येथे कल्पनाशक्तीला मोठा वाव आहे.

काही प्रशिक्षण संस्थामध्ये याकरिता प्रशिक्षणही राबवले जाते. हे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. त्यांना नियामक आवश्यकतांचे पालन करावे लागते. जागेची सजावट करताना पर्यावरणीय तत्त्वांना प्रोत्साहन देणे गरजेचे असते. इंटेरिअर डिझायनर्सकडे सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता असावी लागते, नसल्यास ती अभ्यासाने विकसित करावी लागते. ज्यामुळे लोकांचे जीवन खरोखरच सुधारू शकेल, अशा कार्यात्मक जागा तयार करणे फार गरजेचे आहे. हा व्यवसाय स्वारस्यपूर्ण वाटत असल्यास प्रशिक्षण घेऊन समृद्ध बना !
वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच इंटिरिअर डिझायनिंग हादेखील एक कोर्स आहे. तुम्हाला पदवी दिली जाते. इंटेरिअर डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर तुम्ही घर, कार्यालय, क्लिनिक इत्यादी सजावट करू शकता. याशिवाय तुम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही काम करू शकता.