
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर ‘सापुतारा’ हे थंड हवेचे ठिकाण असून वर्षभर आल्हाददायक असते. हे ठिकाण जरी गुजरातमध्ये येत असले तरी सीमेवर असल्याने तेथे महाराष्ट्रातून जाणे सुलभ आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी असते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे.
सापुतारा येथे सूर्योदय आणि सूर्यास्त ही दोन मुख्य आकर्षणे आहेत. सूर्योदय बघण्यासाठी पहाटे उठून जावे लागते. येथून उगवत्या सूर्याचे होणारे दर्शन अत्यंत विलोभनीय दिसते. या मानाने संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी असंख्य पर्यटक गर्दी करतात. अवघ्या काही मिनिटांतच सूर्य क्षितिजाला टेकतो. सूर्यास्त केव्हा होतो हे समजत नाही.
येथील ‘रोप-वे’ चा प्रवास पर्यटकांना अनोखा अनुभव येतो. केवळ चित्रपटांत पाहण्यास मिळणाऱ्या या ‘रोप-वे’ मध्ये बसण्याचा अनुभव पर्यटकांना ‘वैती हॉटेल’ ने उपलब्ध करुन दिला आहे. हा रोप-वे सापुताऱ्याचे मुख्य आकर्षण आहे.
गुजरात टुरिझमने येथे ‘बोट क्लब’ चालू केला आहे. यामुळे भव्य जलाशयात नौकाविहाराचा आनंद लुटता येतो. नौकेत बसून सफर करताना भोवतालचे सृष्टीसौंदर्य न्याहाळण्याचे सुख आनंददायी असते. वर्षभरात केव्हाही येथे जाता येते. एप्रिल ते जुलै या दरम्यान पर्यटकांची गर्दी सर्वात जास्त असते.

याशिवाय येथे वेगवेगळे फुलांचे आकर्षक बगीचे आहेत. सणावारास येथे आदिवासींचे नृत्य व संगीताचे कार्यक्रम होतात. सापुताऱ्याच्या मध्यभागी एक वस्तुसंग्रहालय आहे. येथे अनेक दुर्मिळ वस्तू पहावयास मिळतात. सापाच्या काही जाती, अजगर वगैरे प्राणी येथे पहायला मिळतात. याशिवाय नागेश्वर मंदिर, स्वामी नारायण मंदिर, इको पॉईंट, स्टेपगार्डन, मत्स्यालय, ऋतुंबरा विश्वविद्यालय, वनस्पती उद्यान इ. पर्यटनस्थळे सापुतारा येथे पाहता येतात.
उंच डोंगरावर संपूर्ण लाकडाने बांधलेले ‘लॉगहट’ हे गेस्ट हाऊस असून ते वन विभागाच्या अखत्यारित आहे. येथून संपूर्ण सापुताऱ्याचे मनोहर दर्शन घडते. सापुताऱ्याजवळ ‘उन्हाई’ हे गरम पाण्याचे झरे आहेत. ‘उन्हाई’ या गुजराथी शब्दाचा अर्थ ‘मी स्नान केले’ असा आहे. हे झरे आरोग्यवर्धक आहेत. त्वचारोगावर गुणकारी आहेत. तेथे स्नान केल्यावर सर्वांचा त्वचारोग नाहीसा होतो, अशी श्रद्धा आहे.
या पर्यटन केंद्रावर जाण्यासाठी मुंबई, पुणे, शिर्डी, नाशिक, बलसाड, बिल्लीमोरा, सुरत येथून थेट बसेस आहेत. रेल्वेने येण्यासाठी नाशिकरोड व बिल्लीमोरा ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.