
बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. हा चित्रपट म्हणजे शाहीर साबळे यांच्यवरील जीवनपट आहे. त्यांनी अजरामर केलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताची यात पुनःनिर्मिती केली गेली असून या गीताला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान, या गीताचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी 25 एप्रिलला यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये पार पडला.
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत शाहिरांनी अजरामर केले आहे. शाहिरांना मानवंदना म्हणून त्याची पुनःनिर्मिती केली आहे. आजचे आघाडीचे 18 कलाकार त्यात सहभागी आहेत. प्रथमेश परब, अभिजित खांडकेकर, स्वप्नील जोशी, भरत जाधव आदेश बांदेकर, ललित प्रभाकर शिव ठाकरे, उमेश कामत, सिद्धार्थ चांदेकर, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, सचिन खेडेकर, गश्मीर महाजनी, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, पुष्कर जोग, प्रसाद ओक आणि सुयश टिळक हे कलाकार या गाण्यात सहभागी झाले आहेत.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्र शासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आहे. ‘नरीमन पॉइंट’ येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला दिग्दर्शक केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया, बेला शिंदे, संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांच्याबरोबरच चित्रपटातील आघाडीचे कलाकार अंकुश चौधरी, सना शिंदे यांचीही उपस्थिती होती.