बटण निर्मिती उद्योग
‘बटण’ ही घराघरात वापरली जाणारी सार्वत्रिक वस्तू आहे. शर्ट, पँट, लहान मुलांचे कपडे, महिलांचे रेडिमेड कपडे, ब्लाऊज यासाठी प्लॅस्टिकची बटणे आवश्यक असतात. कपड्यांसाठी बटणे तयार करून ती बटणे रेडिमेड कपड्यांच्या उत्पादकांना देण्याचा उद्योग सुरू केल्यास चांगला फायदा होतो. प्लॅस्टिकची बटणे बनविण्यासाठी इलेक्ट्रिक स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. हा उद्योग अल्प प्रमाणात सुरू करायचा असेल, तर बाजारात उपलब्ध असलेली नायलॉन किंवा ॲक्रेलिक बटणे स्वयंचलित यंत्राद्वारे तयार केली जाऊ शकतात.

‘हँडमोल्डिंग’, ‘इंजेक्शन मोल्डिंग’, ‘कॉम्प्रेशन मोल्डिंग’ द्वारे प्लॅस्टिकची बटणे तयार केली जातात. ॲक्रेलिक बटणे बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशात उपलब्ध नसल्याने तो विदेशातून आयात केला जातो. पॉलिस्टर – नायलॉन बटणे तयार करण्यासाठीची यंत्रसामग्री भारतात उपलब्ध आहे.
नायलॉन, ॲक्रेलिक शीट्स घेऊन बटणाच्या आकाराचे तुकडे केले जातात. ‘डिझायनिंग’ यंत्रांच्या मदतीने त्यांना इच्छित आकार दिला जातो. बटणांना छिद्रे पाडून चमक आणण्यासाठी बटणे एका मोठ्या ड्रममध्ये ठेवून पॉलिश केली जातात. ‘कॉम्प्रेशन’ पद्धतीने प्लास्टिकची बटणे तयार करण्यासाठी, कच्चा माल ‘मोल्डिंग बॅरल’ मध्ये ओतला जाऊन ‘हीटर’द्वारे गरम केला जातो. ‘मल्टी कॅविटी मोल्ड्स’ तयार करायच्या बटणांच्या आकारानुसार आणि डिझाइननुसार बसवले जातात. स्वयंचलित यंत्र सुरू करून कच्चा माल ‘मोल्डिंग’च्या साच्यात जातो. बसवलेल्या मोजमापानुसार, डिझाइननुसार बटणे तयार केली जातात.
‘हँडमोल्डिंग यंत्राद्वारे बटणे तयार करण्यासाठी ज्या रंगाची बटणे बनवायची आहेत, त्या रंगाच्या गोळ्या घ्याव्यात. त्या साच्यात टाकाव्यात. ‘डाय’ला उष्णता दिल्यानंतर जितकी बटणे तयार करायची आहेत, त्या संख्येनुसार ‘हॉट डाय’ मध्ये प्लॅस्टिकचे गोळे टाकावेत. तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या डिझाइनमध्ये बटणे तयार केली जातील.

कमीत कमी रकमेत आणि कमी जागेत घरबसल्या सुरू करता येईल असा हा उद्योग आहे. प्लॅस्टिकची बटणे किंवा कच्चा माल खराब होत नसल्यामुळे बटण निर्मिती उद्योगांचे नुकसान होण्याची शक्यता नाही.
फॅशनच्या आधुनिक युगात फॅन्सी वस्तूंना जास्त मागणी असल्याने रंगीबेरंगी, विविध आकर्षक डिझाईनची बटणे बनविण्याच्या व्यवसायामुळे संपूर्ण कुटुंबाला रोजगार मिळतो.प्लॅस्टिक बटणांचे सर्वात मोठे ग्राहक हे वस्त्रोद्योग आहेत. जेथे रेडिमेड कपडे बनवले जातात, अशा कंपन्यांकडे जा. त्यांना अनुरूप अशी रंगीबेरंगी आकर्षक डिझाइनची बटणे तयार करून वस्त्र उत्पादकांना द्या. त्यांच्या कंपनीत जाऊन त्यांना आकर्षक नमुने दाखवा. त्यांच्याकडून मागणी घेऊन त्यांना हव्या त्या डिझाईनची बटणे तयार करून द्या. यासोबतच बटणांचे घाऊक विक्रेते, किरकोळ व्यापारी, शिंपी, लहान – मोठी दुकाने यांना बटणे देऊ शकता. उत्तम रोजगार निर्माण करू शकता.