
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील नागरिकांना राज्याच्या स्थापना दिनान्निमित्त समृद्धी आणि प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रासाठी केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी लिहिले, ” महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. राज्याची संस्कृती मोठी असून येथील लोक कष्टाळू आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय प्रगती समृद्ध केली आहे. आगामी काळातही महाराष्ट्राची प्रगती होत रहावी यासाठी मी प्रार्थना करतो.”
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.राज्याला महान संस्कृती आणि विविध क्षेत्रात राष्ट्राची प्रगती समृद्ध करणारे मेहनती लोक लाभले आहेत.भविष्यातही महाराष्ट्राची अशीच प्रगती होत राहील अशी मी कामना करतो.
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023
गुजरातच्या जनतेलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ”गुजरातने आपल्या सर्वांगीण प्रगतीसोबतच आगळ्यावेगळ्या संस्कृतीमुळे एक ओळख निर्माण केली आहे. आगामी काळातही राज्य विकासाच्या नव्या उंचीला स्पर्श करत राहो, अशी मी प्रार्थना करतो.” विशेष म्हणजे या शुभेच्छा त्यांनी गुजराती भाषेतून दिल्या आहेत.
आज दोन्ही राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त सुमारे ३० राज्यांमधील राजभवनमध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्या राज्यांमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात वंशाच्या लोकांना राजभवनात मेजवानी दिली जाणार आहे. यासोबतच दोन्ही राज्यातील संस्कृती आणि खाद्यपदार्थांची झलक दाखवण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, आसाम आणि उत्तराखंडसह विविध राज्यांतील राजभवनांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.