स्वतःच बनवा दंतमंजन
दंतमंजन म्हटले की, लगेच डोळ्यासमोर ‘विको वज्रदंती’, ‘कोलगेट’, ‘क्लोजअप’, ‘पेप्सोडेंट’, ‘डाबर लाल दंतमंजन’ इत्यादी प्रसिद्ध उत्पादने येतात. प्रत्येक मनुष्याला सकाळी उठल्यावर पहिली गरज दंतमंजनची असते. ओले दंतमंजन आणि ‘भुकटी’ ही दोन प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध असतात. पारंपरिक पद्धतीत चूर्ण बनवण्यासाठी फारसा खर्च येत नाही. बाजारात आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांची मागणी जास्त आहे. दंतमंजन बनविण्याचा लघुउद्योग 50,000 ते 1 लाख भौतिक संसाधनांसह गृहोद्योग म्हणून सुरू करता येतो.

सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये कोळशाची भुकटी बनवा. साधारण 10 किलो कोळशाच्या भुकटीमध्ये 1.5 किलो मीठ, 250 ग्रॅम तुरटी पावडर घाला. मीठ आणि तुरटीचे बारीक मिश्रण घ्या. सर्व गोष्टी एकत्र करून नीट मिसळून घ्या. सर्व तयार मिश्रण कापडातून चाळून घ्या. कोळशाचे मोठे तुकडे, तुरटीचे तुकडे इत्यादी मिश्रणातून वेगळे करा. चांगल्या दर्जाचे ओले दंतमंजन तयार होईल. या मिश्रणात थोडेसे निलगिरी किंवा इतर कोणतेही सुगंधी तेल टाकल्यास उत्तम सुगंधी टूथपेस्ट बनते. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या या प्रकारच्या ओल्या दंतमंजनामध्ये मध्ये तुरटी आणि निलगिरीचे तेल असल्यामुळे दात खराब होत नाहीत. तोंडाला दुर्गंधीही येत नाही. बाजारातील मागणीनुसार 50 ग्रॅम, 100 ग्रॅम प्लास्टिकच्या बॉक्समध्ये किंवा पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये बंद करून याची विक्री करू शकता.

स्वदेशी किंवा आयुर्वेदिक उत्पादने वापरण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. आयुर्वेदिक उत्पादनांच्या चांगल्या बाजारपेठेमुळे बेरोजगार उद्योजकांना हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. पारंपरिक दंतमंजनाच्या विक्रीसाठी ‘डोअर मार्केटिंग’ करणे उत्तम आहे. जर तुमच्या उत्पादनाचा दर्जा चांगला असेल, तर तुमच्या मालाची गुणवत्ता पाहून तुम्ही ज्या ग्राहकाला आधी उत्पादन विकले असेल, तो ग्राहक तुमच्या मालाचा कायमचा ग्राहक असेल.
आपला माल स्थानिक बाजारपेठेत, किराणा दुकान, पानपट्टीची दुकाने, मॉल्स, औषधांची दुकाने, महिला मंडळाची ग्राहक दुकाने इत्यादी ठिकाणी विक्रीसाठी ठेवा. तुम्ही सुरुवातीला चांगली सवलत दिलीत, तरच हे व्यापारी तुमचा माल विक्रीसाठी ठेवतील.